ख्रिस्तियानो रोनाल्डोने साकारलेल्या ९९व्या आंतरराष्ट्रीय गोलच्या बळावर गतविजेत्या पोर्तुगालने लक्झेमबर्गचे आव्हान २-० असे मोडीत काढताना युरो चषक २०२०च्या फुटबॉल स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले.
रविवारी झालेल्या सामन्यात ३९व्या मिनिटाला ब्रुनो फर्नाडिसने पोर्तुगालचे खाते उघडले. मग उत्तरार्धात ८६व्या मिनिटाला रोनाल्डोने संघाचा दुसरा गोल साकारला. त्यामुळे ‘ब’ गटात युक्रेननंतर पोर्तुगालला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. युक्रेनने सर्बियाशी २-२ अशी बरोबरी साधली.
पुढील वर्षी रोम येथे १२ जूनला सुरू होणाऱ्या युरो चषक स्पर्धेसाठी पात्र ठरणारा पोर्तुगाल हा १७वा संघ ठरला आहे. विश्वविजेते फ्रान्स, स्पेन, इटली आणि इंग्लंड हे संघसुद्धा पात्र ठरले आहेत.
फ्रान्सचा शानदार विजय
फ्रान्सनेही पात्रता अभियानाची सांगता दिमाखदार विजयानिशी केली. ह-गटात फ्रान्सने अल्बानियाचा २-० असा पराभव केला. फ्रान्सकडून कोरेटिन टोलिसो आणि अँटोइन ग्रीझमन यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. युरो पात्रता गाठणाऱ्या तुर्कीने अँडोराचा २-० असा पराभव केला, तर आइसलँडने मोल्डोव्हाला २-१ असे पराभूत केले. इंग्लंडने कोसोव्हाचा ४-० असा धुव्वा उडवला.