क्रिकेट विश्वातील चॅम्पियन संघाबरोबरच सध्या इतर देशांचे नवे क्रिकेट संघदेखील प्रसिद्धी मिळवत आहेत. टी-२० विश्वचषकामध्ये चॅम्पियन संघाबरोबरच अमेरिका, नामिबिया, ओमान, नेपाळ, पापुआ न्यू गिनी या संघांना संधी देण्यात आली होती आणि या संघांनी चांगली कामगिरी देखील केली. दरम्यान अशाच एका वेगळ्या देशाकडून क्रिकेट खेळण्यासाठी दिग्गज खेळाडूने ४१व्या वर्षी आंतरराष्ट्रीय निवृत्तीतून माघार घेतली आहे.
न्यूझीलंडचा माजी अनुभवी क्रिकेटपटू रॉस टेलरने तीन वर्षांनंतर आपली निवृत्ती मागे घेतली आहे. आता तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसणार आहे, पण यावेळी तो न्यूझीलंडसाठी नाही तर दुसऱ्या देशासाठी पदार्पण करेल. रॉस टेलरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या या निर्णयाची माहिती दिली.
किवी संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४० शतकं झळकावणाऱ्या रॉस टेलरच्या या निर्णयाने क्रिकेट चाहते अवाक् झाले आहेत. रॉस टेलरने डिसेंबर २०२१ मध्ये सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
न्यूझीलंडचा खेळाडू रॉस टेलर कोणत्या संघाकडून पुन्हा करणार पदार्पण?
न्यूझीलंडचा माजी कर्णधार रॉस टेलर आता सामोआ या देशाकडून खेळताना दिसणार आहे. ४१ वर्षीय खेळाडूने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना याची माहिती दिली. निवृत्ती मागे घेतल्यानंतर, रॉस टेलरने सामोआ क्रिकेट संघाच्या जर्सीसह त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं, “मला हे जाहीर करताना अभिमान वाटतो आहे की मी निळ्या रंगाची जर्सी घालून क्रिकेटमध्ये सामोआचे प्रतिनिधित्व करेन.”
रॉस टेलर पुढे म्हणाला, “माझ्या आवडत्या खेळामध्ये हे माझं फक्त पुनरागमन नसणार आहे. तर माझ्या वारशाचे, संस्कृतीचे, गावाचे आणि कुटुंबाचे प्रतिनिधित्व मला करता येणार आहे, ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. या खेळाला परतफेड करण्याची, संघात सामील होण्याची आणि मैदानावर आणि मैदानाबाहेर माझे अनुभव शेअर करण्याच्या या मिळालेल्या संधीसाठी मी उत्सुक आहे.”
रॉस टेलर पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी सामोआ क्रिकेट संघाला पात्रता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. ऑक्टोबरमध्ये ओमानमध्ये होणाऱ्या विश्वचषक आशिया-पॅसिफिक पात्रता मालिकेत रॉस टेलर सामोआचे प्रतिनिधित्व करेल. सामोआ ग्रुप-३ मध्ये यजमान देश आणि पापुआ न्यू गिनी विरुद्ध सामने खेळेल.
पात्रता स्पर्धेत प्रत्येकी तीन संघांचे तीन गट असतात, प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर सिक्समध्ये प्रवेश करतात. या स्पर्धेतून पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरणारे अव्वल तीन संघ निश्चित होतील. रॉस टेलरने २००६ मध्ये न्यूझीलंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि २०२२ मध्ये शेवटचा सामना खेळला होता.
टेलरने न्यूझीलंडसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये ४५० सामने खेळले आहेत, ज्यात ११२ कसोटी सामने आहेत. न्यूझीलंडकडून निवृत्तीनंतर या वर्षी एप्रिलमध्ये आवश्यक स्टँड-डाऊन वेळेनंतर तो सामोआचे प्रतिनिधित्व करण्यास पात्र ठरला. न्यूझीलंडसाठी त्याच्या नावावर ७६८३ कसोटी धावा, ८६०७ एकदिवसीय धावा आणि १९०९ टी-२० धावा आहेत.