गलिच्छ वस्ती.. मळके कडपे परिधान केलेले लोक.. व्यसनाचे सेवन करणारी तरुण वर्गाची टोळी.. झोपडपट्टी म्हटले की आपल्यासमोर उभे राहणारे प्राथमिक चित्र.. हाताला मिळेल ते काम करून दैनंदिन गरजा पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न.. भविष्याचा विचार करण्यापेक्षा वर्तमानात जगण्याची त्यांची मानसिकता. याच मानसिकतेच्या गदारोळात वाढलेल्या युवा पिढीलाही त्याचे अनुकरण करणे योग्य वाटते. त्यामुळे येथील युवावर्गही व्यसनाकडे किंवा वाममार्गाकडे अधिक आकर्षिला जातो. या युवावर्गाला मार्गदर्शन करणारी पिढीच येथे घडत नसल्याने आहे ते स्वीकारून दिवस ढकला, याकडे त्यांचा कल. या युवकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुंबईत अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. झोपडपट्टीत जाऊन युवकांना मार्गदर्शन करून त्यांची कारकीर्द घडविण्याच्या दृष्टीने विचार करण्यासाठी या संस्था सातत्याने प्रयत्नशील आहेत. पण या अशा शेकडो संस्थांमध्ये क्रीडा माध्यमांतून समाजकल्याणाचा वसा जपणारे हाताच्या बोटावरच आहेत.
त्यापैकी ‘एस फाऊंडेशन’ आणि ‘मॅजिशियन फाऊंडेशन इंडिया’ या दोन संस्थांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो.
विकास चौरसिया आणि रेहमुद्दीन शेख यांनी अनुक्रमे ऐस व मॅजिशियन फाऊंडेशन इंडियाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. कुणाचे तरी मार्गदर्शन मिळाल्यामुळे आज सुखी आयुष्य जगणाऱ्या या दोन अवलियांनी समाजाला देणे लागतो म्हणून या संस्थांची स्थापना केली.
‘रग्बी’ हा समान धागा पकडून झोपडपट्टीतल्या मुलांना खेळाच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची कामगिरी ते बजावत आहेत.
मॅजिशियन फाऊंडेशन इंडिया
कर्नाटकातील गुलबर्गा येथून पोटाची खळगी भरण्यासाठी शेख दाम्पत्य तीन लहान मुलांना सोबत घेऊन काही वर्षांपूर्वी मुंबईत दाखल झाले. कर्नाटकात शेतमजुरीचे काम करून कसेबसे मुलांच्या जेवणाची सोय करणाऱ्या दाम्पत्याने मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. रस्त्याच्या कडेला ताडपत्री आणि दोन बांबूंच्या साहाय्याने उभ्या केलेल्या झोपडीत त्यांनी अनेक पावसाळे घालवले. पालिकेच्या कारवाईनंतर अनेकदा त्यांना उघडय़ावर बस्तान बसवावे लागले. हाताला मिळेल ते काम करता-करता ते कुलाबा येथील आंबेडकर नगरमध्ये दाखल झाले. त्यांच्या गावातल्या काही लोकांच्या साहाय्याने त्यांना नोकरीही मिळाली. ससून डॉकवर मासे साफ करण्याचे, बर्फ विकण्याचे काम ते करू लागले. सोबत त्यांची लहान मुलेही मदतीला होतीच. पण या मुलांमध्ये सर्वात लहान असलेल्या रेहमुद्दीनच्या नशिबात काही वेगळेच लिहिले होते. १९९३ साली ‘डोअर स्टेप स्कूल’ नावाच्या संस्थेने रेहमुद्दीनला शिक्षण घेण्यास भाग पाडले. त्यानंतर शाळेत असताना ‘मॅजिक बस’ संस्थेच्या मार्फत आठ वर्षीय रेहमुद्दीन रग्बीकडे वळला. शाळेत असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर कुटुंबाचा सर्व भार आईने आपल्या खांद्यावर घेतला. या अडचणींवर मात करत रेहमुद्दीनने आपले शिक्षण सुरूच ठेवले आणि त्यासोबत रग्बीही. मात्र बारावीच्या परीक्षेत तीन वेळा नापास झाल्यानंतर त्याने शिक्षणाचा नाद सोडला, परंतु रग्बी त्याच्या अधिक जवळ होता. क्लब ते राज्यस्तर असा प्रवास करत त्याने राष्ट्रीय पातळीवर अनेक पदके नावावर केली. २०११ आणि २०१५च्या राष्ट्रीय स्पध्रेत अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक विजेत्या महाराष्ट्राच्या संघाचे त्याने प्रतिनिधित्व केले. तसेच २०१७च्या फेडरेशन चषक रग्बी स्पध्रेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघासाठीही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. यशाची शिखरे पार करताना जुन्या दिवसांच्या आठवणी रेहमुद्दीनला सतावत होत्या. २०१२ साली त्याने मॅजिशियन फाऊंडेशन इंडियाची स्थापना केली आणि नुकतीच या संस्थेची अधिकृत नोंदणीही केली. काही कारणास्तव शाळेत न जाऊ शकलेल्या आणि अध्र्यावर शाळा सोडलेल्या मुलांना त्याने रग्बीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. दक्षिण मुंबईतल्या विविध भागांत ही संस्था मुलांना खेळाच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य करत आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी ४ ते ५ हजार मुलांना रग्बीच्या प्रशिक्षणासह शिक्षणासाठी प्रवृत्त केले आहे. त्याच्या या कामाची दखल घेत रग्बीच्या राष्ट्रीय संघटनेने त्याच्यावर महाराष्ट्रातील जिल्ह्या-जिल्ह्यांत रग्बीचे प्रशिक्षण देण्यासाठी नोकरीवर ठेवले. त्याने २२ जिल्ह्यांतील जवळपास ४० हजारांहून अधिक मुलांना रग्बीचे प्रशिक्षण दिले आहे. या प्रवासात तो पुन्हा एकदा बारावीची परीक्षा देऊन ८७ टक्क्यांनी उतीर्णही झाला. सध्या तो बी.कॉम.च्या दुसऱ्या वर्षांत शिकत असून पोलीस दलात काम करण्याचा त्याचा निर्धार आहे.
मॅजिक बस संस्थेने रग्बी खेळाकडून त्यांचा मोर्चा फुटबॉलकडे वळवला. त्याच वेळी खेळण्यासाठी उत्सुक असलेल्या युवा खेळाडूंसाठी काही तरी करण्याचा मी निर्णय घेतला आणि त्यातून मॅजिशियन फाऊंडेशन इंडियाची स्थापना झाली.
– रेहमुद्दीन शेख
एस फाऊंडेशन
रेहमुद्दीनप्रमाणे विकास चौरसिया याचीही वाटचाल खडतरच होती. आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसलेल्या कुटुंबात विकास वाढला. वडील मजुरीचे काम करायचे; परंतु घराचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी विकासला बारावीनंतर शिक्षण सोडावे लागले. त्यात एका अपघातात वडिलांना पाय गमवावे लागल्यानंतर विकासवरील जबाबदारी वाढली. हाताला मिळेल ते काम करून तो घरच्यांना मदत करत होता. मात्र महाविद्यालयात शिकत असताना एका मित्राच्या माध्यमातून विकास रग्बीशी जोडला गेला. त्यामुळे शिक्षणानंतरही त्याला रग्बी खेळत राहावे असे वाटत होते, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे घरच्यांचा त्याला विरोध होता. अखेरीस आपल्या मनाचे ऐकत विकासने काम सोडून रग्बी खेळण्याचा निर्णय घेतला. रग्बी प्रशिक्षकाची परीक्षा त्याने दिली आणि त्यात उत्तीर्णही झाला. या प्रवासात त्याने त्याच्यासारख्याच झोपडपट्टीत वाढलेल्या मुलांना रग्बी प्रशिक्षण देण्याचे काम सुरू ठेवले. मानखुर्द येथील लल्लूभाई संकुलात (जेथे झोपडपट्टीतील कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात आले आहे) रग्बी प्रशिक्षणाला सुरुवात केली. घरोघरी जाऊन पालकांना त्यांच्या मुलांना रग्बी खेळण्यास परवानगी मिळवण्यापासून हा प्रवास सुरू झाला. मित्रांच्या साहाय्याने २०१०साली ‘एस फाऊंडेशनची’ स्थापना केली. ही संस्था चालवण्यासाठी सहकारी स्वत:च्या खिशातून पैसे गोळा करत असल्याचेही विकासने सांगितले. झोपडपट्टीतील मुलांना रग्बीच्या माध्यमातून शिक्षणाकडे वळवण्याचा पुढील टप्पा हाती घेतला आणि त्यातही त्यांनी यश मिळाले. शिक्षणातून पळ काढणारी मुले आता चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत आहेत. त्यांच्या संस्थेतून प्रशिक्षण घेतलेली बरीच मुले महाराष्ट्राचे आणि भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत.
चाळीपासून ते शाळांमध्ये आम्ही रग्बी पोहोचवण्याचे ध्येय निश्चित केले. त्या टप्प्यातून आम्ही गेलो आणि आजच्या घडीला २ हजाराहून अधिक खेळाडूंना आम्ही प्रशिक्षण दिले आहे. २० ते २५ शाळांमध्येही आम्ही जोडलो गेलो आहोत.
– विकास चौरसिया
लक्ष्यविरहित आयुष्यातून रग्बीने मला मार्ग दाखवला. संक्रमण शिबिरात राहत असताना गुन्हेगारी, अमली पदार्थाचे सेवन यामध्ये गुंतलो गेलो असतो. एस फाऊंडेशनने दिशा दाखवली. संक्रमण शिबिरातून थेट हाँगकाँग येथे भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. आता मागे वळून पाहायचे नाही.
– शेहबाझ कपूर, भारतीय संघातील खेळाडू