लंडन :कझाकस्तानची एलेना रायबाकिना आणि टय़ुनिशियाची ओन्स जाबेऊर यांनी गुरुवारी उपांत्य सामन्यांत दिमाखदार विजय मिळवत विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीची प्रथमच अंतिम फेरी गाठली.

तिसऱ्या मानांकित ओन्स जाबेऊरने जर्मनीच्या बिगरमानांकित तात्जाना मारियाला  ६-२, ३-६, ६-१ असे नमवले. जाबेऊरने सामन्यातील पहिला सेट सहज जिंकत चांगली सुरुवात केली. मारियाने दुसरा सेट जिंकत सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या सेटमध्ये जाबेऊरने आक्रमक खेळासह विजय मिळवला.

याचप्रमाणे १७व्या मानांकित रायबाकिनाने २०१९च्या विजेत्या हालेपला ६-३, ६-३ असे सरळ सेटमध्ये पराभूत करीत अनपेक्षित निकाल नोंदवला. ती आपल्या कारकिर्दीतील तिसरे जेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करेल. रायबाकिनाने सामन्याच्या सुरुवातीपासून हालेपला दबावाखाली ठेवले आणि पुनरागमनची कोणतीही संधी न देता एक तास आणि १५ मिनिटांमध्ये विजय साकारला.

नदाल उपांत्य फेरीत

दुसऱ्या मानांकित स्पेनच्या नदालने अमेरिकेच्या ११व्या मानांकित टेलर फ्रिट्झला ३-६, ७-५, ३-६, ७-५, ७-६ (१०-४) असे नमवत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत त्याच्यासमोर ऑस्ट्रेलियाच्या निक किरियॉसचे आव्हान असेल. नदालला फ्रिट्झविरुद्धच्या लढतीत चांगला संघर्ष करावा लागला. फ्रिट्झने आक्रमक खेळ करत पहिला सेट ६-३ असा जिंकत आघाडी घेतली. अनुभवी नदालने पुनरागमन करत दुसऱ्या सेटमध्ये ७-५ अशी बाजी मारत सामना १-१ असा बरोबरीत आणला. फ्रिट्झने पुन्हा एका नदालसमोर आव्हान उपस्थित करत तिसरा सेट जिंकला. चौथा सेट फ्रिट्झने टायब्रेकपर्यंत खेचला. परंतु अनुभवी नदालने हा सेट जिंकत सामना पाचव्या सेटपर्यंत नेला. निर्णायक सेटमध्ये नदालने आपला अनुभव पणाला लावत विजय नोंदवला.

सानिया-पॅव्हिच जोडी पराभूत

भारताची सानिया मिर्झा आणि तिचा क्रोएशियाचा साथीदार मॅट पॅव्हिच यांची मिश्र दुहेरीतील वाटचाल संपुष्टात आली. सानिया व पॅव्हिच जोडीने ब्रिटनच्या निल स्कुपस्की आणि अमेरिकेच्या डेसिरे क्रॉजिक जोडीकडून ६-४, ५-७, ४-६ असा पराभव पत्करला. सहाव्या मानांकित सानिया आणि पॅव्हिच जोडीने सामन्याला चांगली सुरुवात केली. त्यांनी पहिला सेट ६-४ असा जिंकत आघाडी मिळवली. स्कुपस्की व क्रॉजिक जोडीने दुसरा सेट जिंकत ७-५ असा जिंकत सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या सेटमध्येही त्यांनी आपली हीच लय कायम ठेवत सानिया व पॅव्हिचला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी न देता विजय साकारला.

अनेक वर्षांची मेहनत आणि त्याग यामुळे मी आज इथवर पोहोचली आहे. हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. आता केवळ एक सामनाच शिल्लक आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूने मला चांगले आव्हान दिले. मात्र मी माझ्या ताकदीने खेळ केला. टय़ुनिशियाची महिला असल्याचा मला अभिमान आहे. या कामगिरीमुळे माझ्या देशात आनंदाचे वातावरण असेल.  -ओन्स जाबेऊर, टेनिसपटू

अंतिम फेरी गाठणे माझ्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. मानसिकदृष्टय़ा या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मी सज्ज होते. जाबेऊरविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी मी उत्सुक आहे. ती चांगली खेळाडू आहे. त्यामुळे तिच्याविरुद्ध खेळताना चांगल्या कामगिरीचे आव्हान माझ्यासमोर असेल.

– एलेना रायबाकिना, टेनिसपटू

रायबाकिना ही ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी (पुरुष किंवा महिला) कझाकस्तानची पहिली टेनिसपटू आहे.

ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी जाबेऊर ही पहिली अरब खेळाडू आणि आफ्रिकन महिला टेनिसपटू ठरली.

उपांत्य फेरी ’ नोव्हाक जोकोव्हिच वि. कॅमेरुन नॉरी ’ राफेल नदाल वि. निक किरियॉस

’ वेळ : सायं. ६.०० वा.  ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, सिलेक्ट १ (संबंधित एचडी वाहिन्या)