त्यावेळी मी माझी फार्मास्युटिकल कंपनीतली नोकरी सोडली होती. आणि सुरेश खरे व श्याम खरे यांनी सुरू केलेल्या ‘व्हिडिओ प्रॉडक्शन कंपनी’मधे पार्टनर म्हणून आलो होतो. एकदा आम्हाला ‘इ.टी.अँड टी.’ या सरकारी संस्थेसाठी स्पोर्ट्सवरचे दोन शैक्षणिक लघुपट करण्यास सांगण्यात आले. क्रिकेट आणि बॅडमिंटन.
क्रिकेटच्या त्या शैक्षणिक कॅसेटसाठी प्रात्यक्षिकं दाखवायला मुलांची गरज होती. मी आमच्या शारदाश्रम सोसायटीसमोरच असलेल्या शारदाश्रम शाळेत गेलो आणि विजयी संघांना ट्रेनिंग देणाऱ्या ‘कोच’ ना भेटलो. त्यांचं नाव रमाकांत आचरेकर. मी माझी गरज सांगितली. आचरेकर सर म्हणाले,‘‘टीम आहे. फॉर्मात असलेली मुलं आहेत. काहीच हरकत नाही. पण एक अडचण आहे. आम्हाला शाळेचं ग्राऊंड नाही. आम्ही शिवाजी पार्कवर प्रॅक्टिस करतो. तिथे शूटिंगसाठी यावं लागेल.’’  आम्ही म्हटलं, ‘येतो’.
मग ठरलेल्या दिवशी सकाळी सुरेश खरे आणि मी कॅमेरा युनिटसह शिवाजी पार्कवर हजर झालो. आचरेकर सर स्वत: मध्यम आकाराचा जड रोलर पिचवर फिरवत होते. मैदानाच्या टोकाशी असलेल्या नळाला लावलेल्या लांबलचक पाइपाचं दुसरं टोक पकडून ग्राऊंडवर पाणी शिंपडत होते.
त्यांच्या शिष्यांनी – विद्यार्थ्यांनी – मग खेळांची, स्ट्रोक्सची प्रात्यक्षिकं कॅमेऱ्यासमोर दाखवली. उभं राहाण्याची पद्धत, नजर, बॅटची पकड, फूटवर्क, डिफेन्सिव स्ट्रोक, हुक शॉट, लेट कट, कव्हर ड्राइव्ह वगैरे. त्या मुलांचं कसब पाहून आम्ही अचंबित होत होतो. दीड दोन तास शूटिंग झालं. आंतरशालेय स्पर्धेत सातत्यानं चांगली कामगिरी करणाऱ्या शारदाश्रम शाळेच्या त्या मुलांनी कॅमेऱ्यासमोर आपला खेळ दाखवला. सरांनी मग एकेकाची ओळख करून दिली. ‘..हा मयूर कद्रेकर. फार छान खेळतो.. हा कांबळी. स्टायलिश आहे. लेफ्टी आहे. सिलेक्टर्सवर इंप्रेशन मारतो.. हा तेंडल्या. टॅलेंडेट आहे. टेक्निकली परफेक्ट आहे. याच्यावर लक्ष ठेवा तुम्ही. बघा काय करेल..’ एका छोटय़ा, नाजूक दिसणाऱ्या, कुरळ्या केसांच्या, गोऱ्यापान मुलाच्या पाठीवर ते थोपटत होते. तेंडल्या संकोचला होता, हळूच आपल्या मित्रांकडे चोरून बघत होता.
शूटिंगनंतर शारदाश्रम शाळेच्या टीमची ती मुलं माटुंग्याच्या मोगल लेनमधे, गोरेवाडीत असलेल्या आमच्या व्हिडिओ एडिटिंग रुममधे आली. त्या वेळी आमच्या बऱ्याच प्रॉग्रॅम्सचं एडिटिंग, आताचे सुप्रसिद्ध निर्माते – दिग्दर्शक विद्याधर पाठारे आणि राजन वाघधरे करायचे.
सकाळी केलेल्या शूटिंगच्या कॅसेट्स एडिटरच्या हातात आल्यावर टीव्ही मॉनिटर्सवर दाखवल्या गेल्या. दाटीवाटीनं एडिटिंग रुममधल्या खुच्र्या – स्टुलांवर बसलेली, भिंतीला चिकटून उभी राहिलेली मुलं शिवाजी पार्कवर झालेलं शूटिंग पाहू लागली. सचिन तेंडुलकर एका खुर्चीवर पुढे वाकून बसला होता. मांडय़ांवर हाताची कोपरं आणि गालांवर पंजे ठेवून अपार उत्सुकतेनं आणि उत्साहानं, स्क्रीनवर आपण दिसतो कसे हे पाहात होता!
त्यानंतर साडेतीन- चार वर्षांतच तो इंडियाच्या टीममध्येच आला. सोळाव्या वर्षी पाकिस्तानात टेस्ट मॅच खेळायला गेला!
मला घडलेल्या लहानग्या सचिनच्या त्या दर्शनानंतर त्याची अनेकानेक रुपं मी पाहिली. अब्दुल कादिरला लागोपाठ सिक्सर्स मारून धुलाई करणारा सचिन, शेन वॉर्नला ‘नाइट मेअर’ वाटणारा सचिन, बॅटिंगला आला की अख्ख्या भारतातले व्यवहार ठप्प करणारा – लाखो करोडोंना टीव्ही रेडिओकडे खेचून नेणारा-श्वास रोखून धरायला लावणारा सचिन, ऑस्ट्रेलिया – पाकिस्तान, इंग्लंड, साऊथ आफ्रिका – वेस्ट इंडिज मधल्या सगळ्या स्टार (आणि टग्या) क्रिकेटर्सच्या कौतुकाचा, प्रेमाचा आणि आदराचा विषय असलेला एकमेव सचिन, अठ्ठय़ाण्णव साली शारजातल्या सेमीफायनलमध्ये तळपणाऱ्या बॅटीने ऑस्ट्रेलियाच्या बोलर्सचा धुव्वा उडवत, चौकार, षटकारांची आतषबाजी करत, झंझावाती फलंदाजी करणारा सचिन, (मी माझ्या आयुष्यात पाहिलेली ती सवरेत्कृष्ट फलंदाजी! आक्रमक, तंत्रशुद्ध आणि नेत्रदीपक! डॉन ब्रॅडमनची बॅटिंग काही मी पाहिली नाही. पण गारफिल्ड सोबर्सची पाहिली आहे. विवियन रिचर्डस, ब्रायन लारा, नील हार्वे, स्टिव्ह वॉ, अ‍ॅडम गिलख्रिस्ट, झहिर अब्बास, जावेद मियाँदाद आणि सुनील गावस्कर, गुंडप्पा विश्वनाथ, राहुल द्रविड यांचीही. पण अशी ‘स्टनिंग’ बॅटिंग कोणीही केलेली मी तरी पाहिली नाही.) आणि लाखो लोकांची आतुरता आणि टेन्शन शिगेला पोहोचलं असताना सेंच्युरींची सेंच्युरी पुरी करणारा सचिन!
आज सगळी माध्यमं व्यापून दशांगुळे उरलेल्या सचिनचं अनेक वर्षांपूर्वीचं रुप मला या त्याच्या सगळ्या पराक्रमांच्या वेळी आठवतं. कोपरं गुडघ्यांवर ठेवून, दोन्ही हातात चेहरा घेऊन, स्वत:चा परफॉर्मन्स एकटक बघत राहिलेला साडेबारा वर्षांचा सचिन मला दिसतो. त्या वेळी मी पाहिला होता तो आणि तसाच. हा पुढे क्रिकेट विश्वाला हादरे देणारा सर्वोत्तम फलंदाज होणार हे तेव्हा कळलं असतं, तर एकाग्र चित्तानं आपली प्रतिमा पाहणाऱ्या सचिन तेंडुलकरची त्या वेळी डायरीत सही नसती का घेऊन ठेवली? (त्यानेही ती – कदाचित पहिलीच स्वाक्षरी – बालसुलभ अपूर्वाईनं दिली असती.) चाळिशीतल्या सचिनला आज ती दाखवता आली असती.
..स्वप्नं पाहाणाऱ्या सचिनची सही.
सचिनमध्ये तांत्रिकदृष्टय़ा कोणतेही दोष आढळणार नाहीत. वेगवान, फिरकी किंवा मध्यमगती गोलंदाजी असू दे, सचिनच सर्वोत्तम ठरणार.
जेफ्री बॉयकॉट, इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू.
सचिनची एकाग्रता विलक्षण आहे. तो बाद होईल, असे कधीच वाटत नाही. हे अतिशय विस्मयकारक आहे. अन्य खेळातल्या क्रीडापटूंसाठी सचिन एक पाठय़पुस्तक आहे.
मार्टिना नवरातिलोव्हा, माजी टेनिसपटू
माझ्यासाठी सचिन हा क्रिकेटमधला महान खेळाडू आहे. त्याच्या संदर्भातील आकडेवारीच पुरेशी बोलकी आहे. तो अतिशय आक्रमक क्रिकेटपटू आहे. त्याला प्रत्यक्ष खेळताना बघण्याची माझी इच्छा आहे.     युसेन बोल्ट, महान धावपटू
ज्या काळात सचिन खेळला त्या कालावधीत मी जन्माला आले, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.
    सानिया मिर्झा, टेनिसपटू
सचिनची भेट हा संस्मरणीय क्षण होता. प्रदीर्घ काळ स्मरणात राहील, अशी ही भेट आहे. क्रिकेटमधील या महान खेळाडूची भेट घेणे हा माझ्यासाठी सन्मान आहे.
    रॉजर फेडरर, टेनिसपटू
दुसरा सचिन होणे नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर एवढय़ा सातत्याने खेळ करणे खरोखर कठीण गोष्ट आहे. संघासाठी सर्वस्व देणारा तो खेळाडू आहे. तो नेहमीच प्रतिस्पर्धी खेळाडूंचा आदर करतो. सचिनच्या महानतेची हीच साक्ष आहे.
    मुथय्या मुरलीधरन, श्रीलंकेचा फिरकीपटू
सचिन हा क्रिकेट खेळण्यासाठी देवाने पृथ्वीवर पाठवलेला दूत आहे.
    रवी शास्त्री, भारताचे माजी क्रिकेटपटू
मी बघितलेला महान क्रिकेटपटू. मी ब्रॅडमन यांना पाहिलेले नाही. जबरदस्त नैसर्गिक क्षमता, धावांसाठीची त्याची भूक यामुळे महान खेळाडूंच्या मांदियाळीत त्याने स्थान पटकावले आहे. सचिनची १०० शतकं ही अद्भुत कौशल्याची प्रचिती देणारी आहेत.     सौरव गांगुली, भारताचा माजी कर्णधार.
सचिन हा पेले आणि मॅराडोना यांचा संगम आहे. सचिनविना क्रिकेटचा खेळ पोरका होणार आहे. क्रिकेटमधला महानत्तम खेळाडूबाबत विचारल्यावर एकच नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे सचिन तेंडुलकर.
    अ‍ॅलन डोनॉल्ड, दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज
जेव्हा तुम्ही सचिनला गोलंदाजी करता तेव्हा तुम्ही गोलंदाजी करत नसता. तुम्ही त्याला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असता. त्याच्याविरुद्ध खेळायची संधी मिळाली आहे हा माझा सन्मान आहे.    अ‍ॅण्ड्रय़ू फ्लिन्टॉफ, इंग्लंडचा माजी खेळाडू
केवळ सचिनचा खेळ पाहण्यासाठी मी अनेकदा चित्रपटांचे चित्रीकरण लांबणीवर टाकले आहे.
                                        अमिताभ बच्चन, महान अभिनेते
त्याच्याबरोबर खेळण्याचा सन्मान मला लाभला आहे. त्याने झळकावलेल्या असंख्य धावा प्रत्यक्ष पाहण्याची संधी मला मिळाली आहे. सचिनबरोबर ड्रेसिंगरुममध्ये वावरण्याचा अनुभव अनोखा आहे. तो अतिशय निष्ठावान आहे.
    अनिल कुंबळे, भारताचा महान फिरकीपटू
तुम्ही त्याला बाद करता आणि तुम्ही सामना अर्धा जिंकल्यागत असते.
    अर्जुन रणतुंगा, श्रीलंकेचे माजी कर्णधार
त्याच्याबद्दलच्या एका गोष्टीसाठी तो कौतुकास पात्र ठरतो ते म्हणजे संतुलन. अतिशय योजनाबद्ध पद्धतीने तो चेंडूला सामोरा जातो.     बिशन सिंग बेदी, भारताचे माजी फिरकीपटू.
तो एक अफलातून क्रिकेटपटू आहे. त्याची स्वत:ची अशी शैली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एवढे सातत्य राखणे आश्यर्चकारक आहे.
    क्लाईव्ह लॉइड, वेस्ट इंडिजचे महान फलंदाज
त्याला क्रिकेट मनापासून आवडते. मेहनत, एकाग्रता आणि निष्ठा या बळावर तो क्रिकेटविश्वाचा राजदूत आहे.
    जावेद मियाँदाद, पाकिस्तानचा महान खेळाडू
जो विक्रम मोडणार नाही असे वाटते, सचिन तो प्रत्यक्षात नावावर करतो. एवढंच मी म्हणू शकतो.
    बापू नाडकर्णी, माजी भारतीय क्रिकेटपटू
सचिनचा खेळ पाहून मला एका जाहिरातीची आठवण येते. त्या जाहिरातीत एक लहान मुलगा गाडीबरोबर खेळत असतो. त्याचे वडील त्याला खेळ थांबवायला सांगतात. तेव्हा तो लहान मुलगा उत्तर देतो, काय करू पेट्रोल खत्म नही होता.. सचिनची धावांची भूक अगदी अशीच आहे.
    युवराज सिंग, भारतीय क्रिकेटपटू
सार्वकालिन महान खेळाडूंमध्ये तुलना करणे मला आवडत नाही. परंतु सचिन तेंडुलकर हा सार्वकालिन महान खेळाडू आहे. ब्रायन लारा, रिकी पॉन्टिंग, व्हिव रिचर्ड्स, अ‍ॅलन बॉर्डर या सगळ्यांना मागे टाकत सचिन अग्रस्थानी आहे. आणि सर डॉन ब्रॅडमन यांच्यापेक्षाही सचिन श्रेष्ठ आहे हे म्हणण्याचे धाडस मी करू शकतो.
    नासीर हुसेन, इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू
मी खेळत असताना, प्रतिस्पर्धी खेळाडू म्हणून सचिन नेहमी मला एक सुसंस्कृत व्यक्ती वाटत असे. भारतीय संघाचा प्रशिक्षक झाल्यावरही माझे मत बदलले नाही. तो एक विनम्र माणूस आहे. क्रिकेटमधला तो एक आदर्श वाटावा असा खेळाडू आहे. वर्तन कसे असावे याचा आदर्श वस्तुपाठ त्याने युवा खेळाडूंसाठी पेश केला आहे.
    गॅरी कर्स्टन, भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक