कर्तृत्व महान असले की खेळाडू खेळत असला किंवा नसला तरी त्याला मानसन्मान मिळतो. ‘भारतरत्न’ हा भारताला सर्वोच्च नागरी पुरस्कार स्वीकारल्यावर भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. एमसीसीने आपल्या संघाचे कर्णधारपद बहाल करीत सचिनचा गौरव केला आहे. २०१०मध्ये एमसीसीने त्याला मानद सदसत्व बहाल केले होते.
एमसीसी आणि शेष विश्व संघ यांचा एकदिवसीय सामना ५ जुलैला लॉर्ड्सवर खेळवण्यात येणार आहे. या वेळी शेष विश्व संघाचे कर्णधारपद ऑस्ट्रेलियाचा महान लेग-स्पिनर शेन वॉर्नकडे आहे. सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये लॉर्ड्सवर एकही शतक झळकावता आले नव्हते. पण निवृत्तीनंतर गावसकर लॉर्ड्सवर एससीसीकडून सामना खेळले आणि त्यामध्ये त्यांनी १८८ धावांची खेळी साकारली होती, हेच सचिनच्या बाबतीतही होईल का, याचीच उत्सुकता साऱ्यांना असेल.