सातत्याने २२ वर्षे क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवणारा सचिन तेंडुलकर हा अनेकांसाठी दंतकथा बनला आहे. सचिन हा दिएगो मॅराडोना आणि पेले या महान फुटबॉलपटूंचा संगम आहे, अशा शब्दांत दक्षिण आफ्रिकेचा महान गोलंदाज अ‍ॅलन डोनाल्डने सचिनवर स्तुतिसुमनांचा वर्षांव केला आहे.
सचिनने क्रिकेट खेळणे थांबवल्यानंतर क्रिकेटविश्व पोरके होणार असल्याची भावना डोनाल्डने व्यक्त केली. ‘‘सचिन तेंडुलकरचा महिमा क्रिकेटपल्याडही आहे. मॅराडोना आणि पेले यांना एकत्र केल्यास सचिनसारखा महान खेळाडू घडतो. अविश्वसनीय वाटावी अशी देदीप्यमान कारकीर्द सचिनच्या नावावर आहे,’’ डोनाल्डने ‘सचिन- क्रिकेटर ऑफ द सेंच्युरी’ या विमल कुमार लिखित पुस्तकात सचिनबद्दलच्या आपल्या भावना मांडल्या आहेत.
‘‘क्रिकेट विश्वातला सवरेत्कृष्ट खेळाडू कोण? असा प्रश्न समोर येताच माझ्या मनात एकच नाव उमटते ते म्हणजे सचिन तेंडुलकर. १९८५मध्ये माझ्या आजोबांनी विस्डेन क्रिकेटर मासिकाच्या माध्यमातून सचिनची आणि माझी ओळख करून दिली. सचिन यॉर्कशायरसाठी खेळत असताना मी त्याला पहिल्यांदा पाहिले. तो सर्वोत्तम खेळाडू आहे हे मी कायमच सांगत आलो आहे आणि माझे हे मत बदलेल असे मला वाटत नाही,’’ असे डोनाल्डने सांगितले.
आपल्या भन्नाट वेगासाठी लोकप्रिय असलेल्या डोनाल्डने सचिनला गोलंदाजी कशी करावी, यासंदर्भात युवा गोलंदाजांना मोलाचा सल्ला दिला आहे. कसोटी सुरू होण्यापूर्वी दोन दिवस तुम्ही सचिनचा अभ्यास करायला सुरुवात करू नका. सचिनला गोलंदाजी करण्यापूर्वी आम्ही अनेक महिने अभ्यास करत असू. भारतीय संघ त्याच्यावर किती अवलंबून होता, याची आम्हाला कल्पना होती. उजव्या हाताने गोलंदाजी करणारे गोलंदाज सचिनविरुद्ध यशस्वी होत असत. १९९६ विश्वचषकापूर्वी मी कर्टली अ‍ॅम्ब्रोजशी चर्चा केली होती. सचिनला पहिले १५ चेंडू सहज खेळायला देऊ नकोस, असा सल्ला अ‍ॅम्ब्रोजने दिल्याचे डोनाल्डने सांगितले.

सचिन, धोनी संघात असल्याने भारत नशीबवान – हेन्रिक्स
सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीसारखे अनुभवी खेळाडू असल्याने भारतीय संघ हा नशीबवान आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या कसोटीत पुनरागमन करणे कठीण जाणार आहे. अनुभवी फलंदाज आणि गोलंदाजांचा भरणा असलेल्या भारतीय संघाविरुद्ध विजय मिळविणे हे खडतर आव्हानच आहे. भारताकडे आर. अश्विन आणि हरभजन सिंगसारखे चांगले गोलंदाज आहेत. घरच्या मैदानावर भारतीय संघ हा नेहमीच बलाढय़ समजला जातो. त्याउलट ऑस्ट्रेलिया संघातील बरेच जण पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आले आहेत. प्रत्येक सामन्यात आम्ही बरेच काही शिकत आहोत. ऑस्ट्रेलिया संघाला अनुभवी खेळाडूंची उणीव जाणवत आहे, असे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मोझेस हेन्रिक्स याने सांगितले.

सचिनला बाद केल्याने आत्मविश्वास उंचावला – लिऑन
सचिन तेंडुलकरला बाद केल्याने माझा आत्मविश्वास उंचावला आहे. जगातल्या सर्वोत्तम फलंदाजाला बाद केल्यानंतर माझ्या आत्मविश्वासात भर पडली आहे. माझ्या गोलंदाजी तंत्रात बदल करण्याची आवश्यकता सध्या वाटत नाही. चेन्नईत भारतीय संघाने रणनीतीप्रमाणे खेळ केला. असे असतानाही सचिन तेंडुलकरसारख्या फलंदाजाला त्रिफळाचीत करणे, ही निश्चितच तुमच्या चांगल्या कामाची पावती आहे. त्या विकेटने मला मनापासून आनंद झाला. माझ्या गोलंदाजीवर भरपूर धावा निघाल्या मात्र जगातील सर्वोत्तम फलंदाजीविरुद्ध हे होणे साहजिक आहे. त्यातही ऑस्ट्रेलियन संघात मी एकमेव फिरकीपटू होतो. फिरकी गोलंदाजी चांगल्या प्रकारे खेळू शकणाऱ्या फलंदाजांसमोर खूप धावा दिल्यास त्यात वावगे काही नाही. या अनुभवातून मी बरेच शिकलो, असे ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लिऑनने सांगितले.