प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत क्रिकेटचा ध्यास जपणाऱ्या जम्मू आणि काश्मीर संघाने चाळीस रणजी जेतेपदे पटकावणाऱ्या मुंबई संघावर ऐतिहासिक विजय मिळवला. या शानदार विजयासाठी त्यांचे कौतुक करण्यासाठी साक्षात मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुकर अवतरला. सार्वकालीन महान खेळाडूंच्या मांदियाळीत समावेश असलेल्या सचिनच्या भेटीने जम्मू आणि काश्मीर क्रिकेटपटू भारावून गेले. वानखेडे मैदानावर सचिनने या संघासोबत एक तास घालवला. या दिमाखदार विजयासाठी सचिनने संघाची प्रशंसा केली. या विजयाने हुरळून न जाता चांगला खेळ करत राहा, असा सल्ला सचिनने संघाला दिला. क्रिकेटविश्वाचा कोहिनूर असलेल्या सचिनसह जम्मू आणि काश्मीर संघातील खेळाडूंनी छायाचित्रे काढली. यानंतर हा संघ चेन्नईला रवाना झाला.