भारताच्या यंदाच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी मालिकेचं नाव तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी असं ठेवण्यात आलं आहे. या मालिकेला पूर्वी पतौडी ट्रॉफी असे नाव होते, ते नाव बदलून नवे नाव देण्यात आले आहे. पण नाव बदल थांबवू न शकल्याबद्दल भारताच्या माजी खेळाडूने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि बीसीसीआयवर टीका केली आहे.

भारताचे माजी वेगवान गोलंदाज करसन घावरी यांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने पतौडी ट्रॉफीचं नाव बदलल्याने नाराजी व्यक्त केली. याशिवाय बीसीसीआय आणि सचिन तेंडुलकर यांनी नाव बदल न रोखल्याने त्यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.

घावरी यांनी असंही म्हटलं आहे की जर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे नाव बदलले असते तर महान सुनील गावस्कर यांनी संपूर्ण भारताला हादरवून टाकलं असतं. २००७ च्या मालिकेतील भारताच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या ७५ वर्षांच्या स्मरणार्थ, ईसीबीने इफ्तिखार अली खान पतौडी आणि त्यांचा मुलगा मन्सूर अली खान (टायगर) पतौडी यांच्या नावावरून ट्रॉफीचं नाव ठेवलं, ज्यांनी दोन्ही देशांचं प्रतिनिधित्व केलं होतं.

एका युट्युब शोमध्ये बोलताना घावरी यांनी बीसीसीआय आणि सचिन तेंडुलकरबद्दल बोलताना म्हटलं, “हे पूर्णपणे चुकीचं आहे. सर्वप्रथम ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज मालिकेला फ्रँक वॉरेल ट्रॉफी म्हणतात. तर भारत-ऑस्ट्रेलिया ट्रॉफीला नेहमीच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी म्हटलं जातं. जर या ट्रॉफीचं नाव बदललं तर गावस्कर संपूर्ण भारताला हादरवतील.”

घावरी म्हणाले, “बीसीसीआयने एमसीसी आणि ईसीबीसमोर आपला मुद्दा मांडायला हवा होता. टायगरचे नाव काढून टाकायला नको होते. या संदर्भात, जेव्हा सचिन तेंडुलकरचं नावाचा उल्लेख आला की, तुझ्या आणि अँडरसनच्या नावावरून या ट्रॉफीचं नाव ठेवलं जाईल, तेव्हा सचिनने नकार द्यायला हवा होता. आक्षेपाचा मुद्दा वेगळा आहे.”

“सर्वात आधी तर आपण आपल्या मुद्द्यावर ठाम राहिलं पाहिजे होतं आणि सांगायला हवं होतं की, नाही, माझ्या नावावरून ट्रॉफीचे नाव ठेवू नये, कारण टायगर पतौडी यांचे नाव आधीच आहे. ते भारतीय क्रिकेटचे एक दिग्गज खेळाडू आहेत. जर तुम्हाला पदक द्यायचं असेल तर आमच्या नावे द्या. ट्रॉफीचं नाव तेच राहिलं पाहिजे”, असं घावरी यांनी पुढे सांगितलं.