आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरची कारकिर्द सर्व क्रिकेटप्रेमींनी अनुभवली आहे. प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा नेटाने सामना करत सचिनने प्रत्येक संघाविरोधात खोऱ्याने धावा केल्या आणि शतकं झळकावली. ९० च्या दशकात काही वर्ष सचिनने भारतीय संघाचं कर्णधारपदही सांभाळलं. परंतू कर्णधार म्हणून सचिनची कामगिरी फारशी चांगली नव्हती असं मत काँग्रेस नेते शशी थरुर यांनी व्यक्त केलं आहे. ते Sportskeeda या संकेतस्थळाशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“सचिनकडे कर्णधापद येण्याआधी मला नेहमी वाटायचं की सचिन हाच कर्णधारपदासाठी योग्य उमेदवार आहे. ज्यावेळी तो कर्णधार नव्हता तेव्हा मैदानात तो खूप सक्रीय असायचा. तो स्लिपमध्ये फिल्डींग करायचा…आपल्या कर्णधाराला गरज असल्यास सल्ला देण्यासाठी धावपळ करायचा, आपल्या सहकाऱ्यांना नेहमी प्रोत्साहन द्यायचा. त्यामुळे मला नेहमी वाटायचं सचिनला कर्णधारपद द्यायला हवं. पण ज्यावेळी सचिनकडे कर्णधारपद आलं, त्यावेळी मात्र अपेक्षाभंग झाला. कर्णधारपदाच्या काळाच सचिनला फारशी भक्कम टीम मिळाली नाही हे जरी खरं असलं तरीही कर्णधार म्हणून सचिनची कामगिरी फारशी चांगली नव्हती. सचिनही हे मान्य करेल.” थरुर यांनी आपलं मत मांडलं.

१९९६ साली सचिनकडे भारतीय संघाचं कर्णधारपद देण्यात आलं. ७३ वन-डे सामन्यांमध्ये सचिनने भारताचं नेतृत्व केलं, ज्यात फक्त २३ सामने भारत जिंकू शकला तर ४३ सामन्यांत भारताला हार पत्करावी लागली. कसोटी क्रिकेटमध्येही सचिनची कर्णधार म्हणून कामगिरीही ही खराब राहिलेली आहे. एकूण २५ कसोटी सामन्यांत सचिनने भारताचं प्रतिनिधीत्व केलं. ज्यात फक्त ४ कसोटी सामने भारताने जिंकले तर ९ सामन्यांत भारताला पराभव स्विकारावा लागला. उर्वरित सामने अनिर्णित राहिले. थरुर यांच्या मते कर्णधारपदाच्या काळात सचिनला स्वतःच्या फलंदाजीचाही विचार करावा लागत असल्यामुळे तो फारसा चांगला कर्णधार होऊ शकला नाही. यानंतर सचिनने स्वतः कर्णधारपद सोडून फलंदाजीवर लक्ष केंद्रीत केलं. यानंतर गांगुलीच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा सचिनला कर्णधारपदासाठी विचारणा झाली होती…ज्याला सचिनने नकार दिला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar didnt have a strong team but he wasnt the most motivational captain either says shashi tharoor psd
First published on: 06-09-2020 at 13:04 IST