Sachin Tendulkar Plane Emergency Landing: भारतीय संघाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरवर मोठं संकट ओढावलं होतं. सचिन आपल्या छोटेखानी विमानातून प्रवास करत होता. त्यावेळी तीव्र वादळामुळे केनियातील मसाई मारा जंगलात या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं आहे. हा व्हिडीओ सचिनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला त्याने हटके कॅप्शनही दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
सचिनने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करून या घटनेबाबत माहिती दिली आहे. सचिनने व्हिडीओमध्ये सांगितले की, तो केनियातील मसाई मारा जंगलाच्या वरून उड्डाण करत होता. त्यावेळी भयानक वादळ दिसले. वातावरण उड्डाणासाठी अनुकूल नसल्याने पायलटला दोनदा लँडिंग करावं लागलं. धावपट्टी मोकळी झाल्यानंतर विमान दुसऱ्या बाजूला यशस्वीरित्या लँड करण्यात आले. पण अडचणी इथेच संपल्या नव्हत्या.
वातावरण उड्डाण घेण्यासाठी अनुकूल नसल्याने सचिनला तिथेच थांबावं लागलं. त्याला घेऊन जाण्यासाठी जिप येत असल्याचं त्याने व्हिडीओमध्ये सांगितलं. जर त्याला घेण्यासाठी जिप आली नाही, तर त्याला रात्रभर या जंगलात राहावं लागेल, असं त्याने व्हिडीओमध्ये सांगितलं. पण या कठीण काळातही तो एन्जॉय करत असल्याचंही त्याने या व्हिडीओमध्ये सांगितलं. या व्हिडीओवर क्रिकेट चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. मास्टर ब्लास्टर अडचणीत असताना क्रिकेट चाहत्यांनी त्याच्या सुरक्षितेसाठी प्रार्थना केली आहे. तसेच अनेकांनी त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
सचिन होणार बीसीसीआयचा पुढील अध्यक्ष?
येत्या २८ सप्टेंबरला बीसीसीआयची वार्षिक बैठक होणार आहे. या बैठकीत बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान या शर्यतीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावाची देखील चर्चा होती. पण, सचिन तेंडुलकरच्या टीमने आपल्या निवेदनात, या सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले, “भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआयच्या) अध्यक्षपदासाठी सचिन तेंडुलकरच्या नावाचा विचार किंवा नामांकन करण्याबाबत काही वृ्त्ते आणि अफवा पसरवल्या जात असल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की, अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. आम्ही सर्वांना या अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन करतो.”