नुकतेच भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याचा ICCकडून मानाच्या Hall of Fameमध्ये समावेश करण्यात आला. या यादीतील दिग्गज क्रिकेटपटूंच्या रांगेत त्याला स्थान मिळाल्याने भारतीय क्रिकेटरसिकांना आनंद झाला. द्रविड या यादीतील पाचवा भारतीय ठरला. याआधी भिशन सिंग बेदी, कपिल देव, सुनील गावस्कर आणि अनिल कुंबळे या चार भारतीयांना या यादीत स्थान मिळाले आहे. मात्र, या दिग्गज क्रिकेटपटूंच्या यादीत क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा समावेश अद्याप का करण्यात आलेला नाही?, असा सवाल क्रिकेटरसिकांच्या मनात आहे.

सचिनच्या नावावर अनेक विक्रम आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक २०० कसोटी सामने, ४६३ एकदिवसीय सामने, कसोटी क्रिकेटमध्ये १५ हजाराहून अधिक धावा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८ हजाराहून अधिक धावा… हा एवढा पराक्रम Hall of Fame मध्ये स्थान मिळवण्यासाठी पुरेसा नाही का? असा प्रश्नदेखील क्रिकेट रसिकांच्या मनात घर करताना दिसत आहेत. पण या यादीत अद्याप सचिनचा समावेश करण्यात आलेला नाही. पण, यामागे एक वेगळेच कारण आहे.

Hall of Fame या मानाच्या यादीत स्थान पटकवण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन ५ वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे. सचिनने २०१३ साली नोव्हेंबर महिन्यात आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. विंडीजविरुद्ध घरच्या मैदानावर त्याने शेवटचा कसोटी सामना खेळून क्रिकेटला अलविदा केले होते. त्यामुळे या यादीत समावेश होण्याच्या निकषात बसण्यासाठी सचिनला अजून काही काळ वाट पहावी लागणार आहे.

दरम्यान, Hall of Fameच्या यादीत कोणत्या खेळाडूला समाविष्ट करून घ्यायचे, याचा निर्णय पूर्णपणे आयसीसीच्या व्यवस्थापनावर अवलंबून असतो.