मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सचिन तेंडुलकरने नुकताच एका चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत लहानगा मुलगा गोलंदाजी टाकताना दिसत आहे. चिमुकल्याच्या गोलंदाजीने सचिन तेंडुलकरही भारावून गेला आहे. आपल्या फिरकीच्या जादूने हा मुलगा त्रिफळा उडवत आहे.

“व्वा!, हा व्हिडिओ एका मित्राकडून मिळाला आहे. तो खूप छान आहे. या लहान मुलाचे खेळासाठी असलेले प्रेम आणि आवड स्पष्ट दिसत आहे.”, अशी पोस्ट सचिन तेंडुलकरने करत व्हिडिओ पोस्ट केला आहे.

सचिन त्याच्या कारकिर्दीत २०० कसोटी सामने खेळला असून त्यात ३२९ डाव खेळण्याची संधी मिळाली. त्यात त्याने ५३.७९ च्या सरासरीने १५,९२१ धावा केल्या. यात ६ दुहेरी शतकं, ५१ शतकं आणि ६८ अर्धशतकांचा समावेश आहे. संपूर्ण कसोटी कारकिर्दीत सचिनने २,०५८ चौकार आणि ६९ षटकार मारले आहेत. त्याची एकदिवसीय सामन्यातील कामगिरी कायम स्मरणात राहणारी आहे. सचिन ४६३ एकदिवसीय सामने खेळला. त्यात त्याने १८,४२६ धावा केल्या. यात एक द्विशतक, ४९ शतकं आणि ९६ अर्धशतकांचा समावेश आहे. यात त्याने एकूण २०१६ चौकार आणि १९५ षटकार ठोकले आहेत. सचिन त्याच्या कारकिर्दीत एकच आंतरराष्ट्रीय टी २० सामना खेळला. तर आयपीएलमध्ये सचिननं ७८ सामने खेळले. त्यात १ शतक आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे.