मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांच्यात कॅरमचा सामना रंगला. मुंबई इंडियन्स संघात स्थान मिळूनही खेळण्याची संधी न मिळालेल्या अर्जुन तेंडुलकरने कॅरम बोर्डवर आपल्या बोटांची जादू दाखवली. यावेळी अर्जुनच्या तेंडुलकरच्या टीममध्ये मुंबईचा यष्टीरक्षक आदित्य तरे होता. कॅरमच्या या सामन्यात सचिनच्या टीमने बाजी मारली. सचिन तेंडुलकरने एकदम जबरदस्त शॉट्स मारत क्वीन घेतली. यानंतर सचिनने अर्जुनकडे पाहात त्याला डोळा मारला. हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने आपल्या फेसबुक अकाउंटवरून शेअर केला आहे.
कॅरम खेळताना अर्जुन वारंवार तक्रार करत होता. तेव्हा सचिनने त्याला “तक्रार करू नको, कबुल कर”, असा सल्ला दिला. मास्टर ब्लास्टर सचिनने केवळ क्रिकेटच नाही तर इतर खेळातही सर्वोत्तम असल्याचं दाखवून दिलं. अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या संघात असून सचिन मेंटॉर आहे.
गेल्या वर्षी झालेल्या लिलावात अर्जुनला २० लाखांची बोली लावत मुंबईने आपल्या ताफ्यात सामील केले. मात्र दुखापतीमुळे त्याला स्पर्धा अर्ध्यातच सोडावी लागली. अर्जुन तेंडुलकरऐवजी मुंबईच्या संघात सिमरजीत सिंगला स्थान देण्यात आलं होतं. अर्जुन नेट गोलंदाज म्हणून संघाच्या फलंदाजांना प्रशिक्षण देत होता. त्याला मुंबईकडून खेळणाऱ्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवता आले नव्हते.
मुंबईचा संघ यंदा प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला. कोलकाता आणि मुंबईचे गुण समान होते. मात्र धावगतीने कोलकात्याचा संघ आघाडीवर असल्याने प्लेऑफमध्ये स्थान मिळालं.