सचिन, गांगुली, लक्ष्मण यांची मागणी
भारतीय क्रिकेट संघाचा नवीन प्रशिक्षक कधी नेमला जाणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. पण प्रशिक्षकाची निवड करणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सल्लागार समितीने आता या कामासाठी मानधनाची मागणी केल्याने या प्रकरणात नवीन वळण आले आहे. प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी आम्हाला मानधन हवे, अशी मागणी सल्लागार समितीमधील माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही. एस. लक्ष्मण यांनी बीसीसीआयला केली आहे. बीसीसीआय आपल्या समितीमधील सदस्यांना कोणतेही मानधन देत नाही, हे यापूर्वी सांगूनही या तिघांनी पुन्हा एकदा मानधनाची मागणी केली आहे.
इंग्लंडमध्ये सध्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. गुरुवारी भारत आणि श्रीलंकेच्या सामन्यानंतर सल्लागार समितीची पहिली बैठक पार पडली आणि यामध्ये प्रशिक्षक निवडीसाठी मानधन देण्यात यावे, अशी मागणी या तिन्ही माजी क्रिकेटपटूंनी बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांना केली. आता जोहरी त्यांची ही मागणी बीसीसीआयच्या प्रशसकीय समितीपुढे मांडणार आहेत.
‘‘यापूर्वीही या तीन माजी क्रिकेटपटूंनी बीसीसीआयकडे मानधनाची मागणी केली होती. पण त्यावेळी ही मागणी फेटाळण्यात आली. बीसीसीआयच्या कोणत्याही समिती सदस्यांना मानधन देण्यात यात नाही, असे आम्ही यापूर्वीच त्यांना सांगितले आहे. पण तरीही पुन्हा त्यांनी मानधनाची मागणी केली आहे,’’ असे बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले.
जगमोहन दालमिया हे बीसीसीआयचे अध्यक्ष असताना त्यांनी सल्लागार समितीची स्थापना केली होती. खेळाने जे आपल्याला दिले आहे ते आपण परत करायला हवे, हे मनाशी ठरवून दालमिया यांनी या तिन्ही दिग्गज फलंदाजांची या समितीमध्ये निवड केली होती. सध्याच्या घडीला गांगुली आणि लक्ष्मण हे सल्लागार समितीमधील सदस्य बीसीसीआयच्या समालोचकांच्या चमूतही आहेत.
‘‘काही वर्षांपूर्वी सल्लागार समितीने आम्हाला करारबद्ध करावे आणि उचित मानधन द्यावे, अशी मागणी बीसीसीआयकडे केली होती. त्यावेळी आम्ही त्यांना बीसीसीआयची नियमावली पाठवली होती. त्यानुसार बीसीसीआय आपल्या समितींमधील सदस्यांना कोणतेही मानधन देत नाही, पण त्यांचा वास्तव्याचा, गाडीचा आणि दिवसांतील काही खर्च देण्यात येतो. पण या तिघांनीही ही नियमावली आमच्याकडे पुन्हा पाठवून दिली होती आणि आता पुन्हा एकदा त्यांनी मानधनाची मागणी केली आहे,’’ असे बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले.