भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारतीय संघाला टी-२० विश्वचषक, वन-डे विश्वचषक आणि चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकवून देणारा यशस्वी कर्णधार अशी धोनीची ओळख संपूर्ण जगाला आहे. धोनीच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०११ साली मुंबईच्या वानखेडे मैदानावर श्रीलंकेवर मात करत विश्वचषक जिंकला. सचिन तेंडुलकरचा हा शेवटचा विश्वचषक असल्यामुळे ही स्पर्धा सर्वांना कायम लक्षात राहते.

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर सचिननेही त्याला ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत. तुझ्यासोबत २०११ चा विश्वचषक जिंकणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात संस्मरणीय क्षण होता. तुझ्या दुसऱ्या इनिंगसाठी तुला शुभेच्छा असं म्हणत सचिनने धोनीचं अभिनंदन केलं आहे.

आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत धोनीने अनेक विक्रम केले. कॅप्टन कूल नावाने ओळखला जाणाऱ्या धोनीचं यष्टीरक्षण, हेलिकॉप्टर शॉट, विद्युत वेगाने होणारं स्टम्पिंग या सर्व गोष्टी चाहत्यांच्या कायम लक्षात राहणार आहे. आगामी टी-२० विश्वचषकासाठी धोनीला अजुनही भारतीय संघात जागा मिळेल अशी अनेकांना आशा होती. परंतू त्याआधीच धोनीने सन्मानाने निवृत्त होणं पसंत केलं आहे.