Ben Duckett Sai Sudharsan Words Exchange Video: भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेत दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये आपण अनेक वाद होताना पाहिले. सामन्यादरम्यान मैदानात दोन्ही संघांचे खेळाडू मैदानावर एकमेकांशी बाचाबाची करताना दिसले. ओव्हल कसोटीही याला अपवाद राहिली नाही. सध्या सुरू असलेल्या ओव्हलच्या मैदानावरील पाचव्या कसोटीत रूट-प्रसिधच्या वादानंतर साई सुदर्शन आणि बेन डकेट यांच्यातही बाचाबाची झाली. ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
भारतीय संघाला पहिल्या डावात २२४ धावांवर सर्वबाद केल्यानंतर इंग्लंडच्या सलामीवीरांनी विस्फोटक फलंदाजी केली. जॅक क्रॉली आणि डकेट यांनी ९२ धावांची भागीदारी करत झटपट धावा केल्या. पण या दोघांची भागीदारी तोडत भारताच्या गोलंदाजांनी पुनरागमन केलं आणि इंग्लंडला धावा करण्याची संधीच दिली नाही. यानंतर इंग्लंडचा संघ २४७ धावांवर सर्वबाद झाला.
ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या डावात आधी प्रसिध कृष्णा आणि जो रूट यांच्यात मैदानातच वाद झाला. जो रूटने यादरम्यान त्याला थेट शिव्याच घातल्या. हा वाद शांत होईपर्यंत भारताच्या फलंदाजीदरम्यान बेन डकेट आणि साई सुदर्शन यांच्यात मैदानात बाचाबाची झाली. ज्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
साई सुदर्शन-बेन डकेटमध्ये शाब्दिक बाचाबाची
ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या डावातही साई सुदर्शन स्वस्तात बाद झाला. दुसऱ्या डावात फक्त ११ धावा करून साई बाद झाला. दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्राच्या १८ व्या षटकात, साई सुदर्शनच्या रूपात टीम इंडियाला दुसरा धक्का बसला. सुदर्शनला गस एटकिन्सनने पायचीत करत बाद केलं.
डकेट-साईमध्ये कशावरून झाला वाद?
मैदानावरील पंचांनी बाद दिल्यानंतर साईने रिव्ह्यू घेतला, पण तिसऱ्या पंचांनीही भारतीय फलंदाजाला बाद दिलं. साई पॅव्हेलियनमध्ये परतत असताना अचानक मागे फिरला आणि बेन डकेटजवळ गेला. साई मैदानाबाहेर जात असताना डकेटने त्याला काहीतरी म्हणत चिडवलं त्यामुळे साई माघारी परतला आणि डकेटच्या जवळ जात त्याला चांगलंच सुनावलं. दोघांमध्येही शाब्दिक बाचाबाची झाली आणि हॅरी ब्रूकने मध्यस्थी केली आणि त्याने साईला जाण्यासाठी सांगितलं, तर डकेटलाही मागे खेचत होता.
इंग्लंडचा पाचव्या कसोटीतील कर्णधार ऑली पोपदेखील त्यांना थांबवण्यासाठी पुढे येताना दिसला. यासह मैदानावर भारतीय आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये सातत्याने वादावादी होताना दिसत आहे. पाचवा सामना हा मालिकेच्या निकालाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे.
भारत आणि इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमान संघ २-१ ने पुढे आहे. मँचेस्टर कसोटी सामना अनिर्णित राहिला. यानंतर भारताला मालिका जर ड्रॉ करायची असेल तर पाचवा कसोटी सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागणार आहे. इंग्लंडने जर हा सामना जिंकला तर यजमान संघ ३-१ ने मालिका आपल्या नावे करतील.