अव्वल भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप या दोघांनी ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर घसरण झालेल्या सायनाने ३४ मिनिटांच्या लढतीत इंडोनेशियाच्या बेलाइट्रिक्स मनुपुतीवर २१-१६, २१-११ अशी मात केली. कश्यपने जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असणाऱ्या जपानच्या केनिची तागोला २१-१८, २१-१२ असे नमवले.
सायनाने स्मॅशच्या फटक्यांचा अचूकपणे वापर करत मनुपुतीला निष्प्रभ केले. मनुपुतीने नेटजवळून कलात्मक खेळ केला मात्र सायनाचा झंझावात रोखण्यासाठी आवश्यक फटक्यांतील वैविध्य नसल्याने ती पिछाडीवर पडली. पहिल्या गेममध्ये ७-३ अशी आघाडी घेतलेल्या सायनाने ही आघाडी कायम राखत ११-७ अशी आघाडी मिळवली. मात्र मनुपुतीने झुंज देत १२-१२ अशी बरोबरी केली. मात्र यानंतर सायनाने मोठी आघाडी देत पहिल्या गेमवर कब्जा केला.
दुसऱ्या गेममध्ये सायनाने अधिक आक्रमकपणे खेळ करत ११-२ अशी मोठी आघाडी घेतली. मनुपुतीने संघर्ष करत सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. सायनाने तिला कोणतीही संधी न देता दुसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला. पुढच्या फेरीत सायनाचा मुकाबला सिझियान वांगशी होणार आहे.
पुरुषांमध्ये कश्यपने नेटजवळून अप्रतिम खेळ तसेच स्मॅशच्या फटक्यांचा प्रभावीपणे वापर करत तागोला चीतपट केले. कश्यपने पहिल्या गेममध्ये सुरुवात चांगली केली. ६-३ यावरून त्याने ११-१० अशी आघाडी मिळवली. तागोने १२-१२ अशी बरोबरी केली. मात्र कश्यपने त्याला आगेकूच करू न देता पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये कश्यपने आपला खेळ आणखी उंचावला. त्याने ४-३ अशी अल्प आघाडी घेतली. मात्र त्यानंतर जोरदार मुसंडी मारत त्याने तागोचे आव्हान संपुष्टात आणले. पुढील फेरीत कश्यपसमोर चीनच्या चेन लाँगचे आव्हान असणार आहे. लाँगविरुद्धच्या तीन लढतींत कश्पयला पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र गेल्या वर्षी इंडोनेशियन खुल्या स्पर्धेत कश्यपने लाँगवर मात केली होती.
पुरुषांमध्ये युवा खेळाडू सौरभ वर्माला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. व्हिएतनामच्या तिअन मिन्ह ग्युयेनविरुद्ध सौरभने जोरदार संघर्ष केला, मात्र अखेर ग्युयेनने हा
सामना २१-१९, २१-१९ असा जिंकला.
सायनाची तिसऱ्या स्थानावर घसरण
नवी दिल्ली : भारताची ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालची जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. महिलांमध्ये पी.व्ही. सिंधू हिने आपले १६वे स्थान कायम राखले आहे. पुरुषांमध्ये ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणाऱ्या पी. कश्यपने क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम नववे स्थान गाठले आहे. मुंबईच्या अजय जयरामने ३१ वे, तर आनंद पवारने ४५ वे स्थान पटकावले.
संग्रहित लेख, दिनांक 9th Mar 2013 रोजी प्रकाशित
सायना, कश्यप उपांत्यपूर्व फेरीत
अव्वल भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप या दोघांनी ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर घसरण झालेल्या सायनाने ३४ मिनिटांच्या लढतीत इंडोनेशियाच्या बेलाइट्रिक्स मनुपुतीवर २१-१६, २१-११ अशी मात केली.

First published on: 09-03-2013 at 04:35 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina kashyap enter quarterfinals of all england cship