काही दिवसांपूर्वीच जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान आणि भारतीय खुल्या स्पर्धेचे जेतेपद असा दुहेरी आनंद देणाऱ्या सायनाची मलेशिया सुपर सीरिज स्पर्धेत शनिवारी दुहेरी निराशा झाली. चीनच्या ली झेरुईने रोमांचक मुकाबल्यात सायनावर १३-२१, २१-१७, २२-२० असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.
या पराभवामुळे सायनाला क्रमवारीतले अव्वल स्थान गमवावे लागणार आहे. झेरुईविरुद्धच्या अकरापैकी नऊ लढतींत सायनाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. एक तास आणि आठ मिनिटांच्या लढतीत झेरुईने दुखापतींनी त्रस्त असतानाही झुंजार खेळ करीत शानदार विजय साकारला.
पहिल्या गेममध्ये ६-६ अशी बरोबरी होती. ही आघाडी वाढवत सायना १५-७ अशा मजबूत स्थितीत पोहोचली. उजव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे झेरुईच्या हालचालींवर मर्यादा आल्या होत्या. याचा फायदा घेत सायनाने पहिला गेम नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये सायनाकडे ३-१ अशी आघाडी होती. मात्र झेरुईने अप्रतिम फटक्यांची पोतडी उघडत १०-१० अशी बरोबरी केली. प्रदीर्घ रॅली, तडाखेबंद स्मॅशचे फटके यांच्या बळावर झेरुईने सातत्याने गुण मिळवत दुसरा गेम जिंकला.
तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये झेरुईच्या हातून भरपूर चुका झाल्या. त्याच वेळी सायनाने आक्रमक पवित्रा स्वीकारत १२-७ अशी भक्कम आघाडी घेतली. मात्र विजयाच्या ईष्र्येने खेळणाऱ्या झेरुईने हल्लाबोल करीत सलग पाच गुणांची कमाई केली. बॉडीलाइन स्मॅश, क्रॉसकोर्ट, ड्रॉप आणि नेटजवळून सुरेख खेळ यांच्या बळावर झेरुईने सायनाला निष्प्रभ केले. मात्र, सायनाने १९-१८ अशी निसटती आघाडी घेतली. मात्र झेरुईने २०-१८ अशी आघाडी घेतली. यानंतर सायनाने मॅचपॉइंट वाचवला खरा, पण अखेर जबरदस्त स्मॅशच्या फटक्यासह झेरुईने तिसऱ्या गेमसह सामना जिंकला.
आकडय़ांचा खेळ
उपांत्य फेरीपूर्वी सायनाचे क्रमवारी गुण ७८५४१ होते. ली झेरुईविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागल्याने तिला १,६५० गुण मिळतील. यामुळे तिचे एकूण गुण ७८,५४१ वरून ८०,१९१ इतके होणार आहेत. दुसरीकडे क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असणाऱ्या झेरुईचे एकूण गुण ७१४१४ वरून ८०,७६४ इतके गुण होणार आहेत. झेरुईकडे फक्त ५७३ गुणांची आघाडी आहे. त्यामुळे लवकरच सायनाला पुन्हा अव्वल स्थान पटकावण्याची संधी मिळेल.
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2015 रोजी प्रकाशित
दुहेरी निराशा..
जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान आणि भारतीय खुल्या स्पर्धेचे जेतेपद असा दुहेरी आनंद देणाऱ्या सायनाची मलेशिया सुपर सीरिज स्पर्धेत शनिवारी दुहेरी निराशा झाली.
First published on: 05-04-2015 at 02:18 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina loses no 1 ranking after malaysia open loss