यंदाच्या वर्षांतल्या पहिल्यावहिल्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सायना नेहवालने चीन सुपर सीरिज प्रीमिअर बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. सायनाच्या बरोबरीने पारुपल्ली कश्यपने विजयी सुरुवात केली. सहाव्या मानांकित सायनाने जपानच्या नोझोमीवर सरळ गेम्समध्ये २१-१४, २१-१९ अशी मात करत दुसऱ्या फेरीत आगेकूच केली.  पुढील फेरीत सायनाचा मुकाबला चीनच्या स्युन युशी होणार आहे.
कश्यपने थायलंडच्या बूनसुक पोनसन्नावर २२-२०, २१-१५ असा विजय मिळवला. अन्य लढतींमध्ये नागपूरकर अरुंधती पनतावणेने जपानच्या इरिको हिरोसेला २१-१४, २१-१८ असे नमवले. मुंबईकर आनंद पवार आणि अजय जयराम यांना पराभवाला सामोरे जावे लागले. जपानच्या ताकुमा उइडाने आनंदवर १८-२१, २१-१०, २१-११ अशी मात केली तर कोरियाच्या वान हो सोनने अजय जयरामवर २१-१८, २१-१९ असा विजय मिळवला.