प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत सायना नेहवालने नवी दिल्ली येथे सुरू होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मलेशिया येथे झालेल्या सुपर सीरिज फायनल स्पर्धेत सायनाचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आले. २०१३ मोसमात एकाही जेतेपदावर नाव कोरू न शकलेल्या सायनाने सहा वर्षांच्या कालावधीनंतर राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तिने आपली प्रवेशिका संयोजकांकडे पाठवली होती. मात्र ताप तसेच संसर्गामुळे सायनाने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
सायनाला विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेत ती खेळू शकणार नाही, असे भारतीय बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष टीपीस पुरी यांनी सांगितले. दरम्यान, आजारपणामुळे सायना पुढील महिन्यात होणाऱ्या कोरिया सुपर सीरिज स्पर्धेतही सहभागी होणार नाही.

करिश्मा मुख्य फेरीत
मुंबई : मुंबईकर करिश्मा वाडकर तसेच नागपूरच्या रसिका राजेने राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मुख्य फेरीत आगेकूच केली. चित्रलेखा, श्रेयंशी परदेशी, वैष्णवी नायर, धन्या नायर, श्री कृष्णप्रिया यांनीही मुख्य फेरीत धडक मारली. करिश्माने  संतोषी हसिनीला २१-८, १३-२१, २१-१९ असे हरवले.