सुपर सीरिज फायनल्स बॅडमिंटन स्पर्धा
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालला वर्षअखेरीस सुपर सीरिज फायनल्स स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यातच पराभवाला सामोरे जावे लागले. अटीतटीच्या लढतीत डेन्मार्कच्या टिने बूनने सायनावर २१-१४, ११-२१, २१-१९ अशी मात केली. लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाकडून झालेल्या पराभवाची बूनने परतफेड केली. पहिल्या गेममध्ये स्मॅशच्या जोरदार फटक्यांच्या जोरावर बूनने पहिला गेम नावावर केला. सामन्यातील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दुसरा गेम जिंकणे सायनासाठी क्रमप्राप्त होते. पहिल्या गेममधील चुका टाळत आणि नेटजवळून सुरेख खेळ करत सायनाने दुसऱ्या गेमवर कब्जा केला. १-१ अशी बरोबरी झाल्याने तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये जबरदस्त मुकाबला पाहायला मिळाला. बूनने सुरुवातीला दमदार आघाडी घेतली. मात्र त्यानंतर सायनाने पुनरागमन केले. बूनने स्मॅशच्या फटक्यांचा आधार घेत तुफानी आक्रमण करत सायनाला पिछाडीवर ढकलले. ही पिछाडी भरून काढणे सायनाला कठीण गेले. बूनला विजयासाठी काही गुणांची आवश्यकता असताना सायनाने एक-एक गुण घेत मुकाबला चुरशीचा केला मात्र बूनने आपला अनुभव पणाला लावत सरशी साधली. गटवार पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेत पहिल्या लढतीत पराभव झाल्याने गुरुवारी थायलंडच्या रतचंन्नोक इनथॅनॉनविरुद्धच्या लढतीत सायनावर दडपण असणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Dec 2012 रोजी प्रकाशित
सायनाला पराभवाचा धक्का
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालला वर्षअखेरीस सुपर सीरिज फायनल्स स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यातच पराभवाला सामोरे जावे लागले. अटीतटीच्या लढतीत डेन्मार्कच्या टिने बूनने सायनावर २१-१४, ११-२१, २१-१९ अशी मात केली.

First published on: 13-12-2012 at 04:07 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal shocked defete