विजेतेपदाची दावेदार असलेल्या सायना नेहवाल व किदम्बी श्रीकांत या भारतीय खेळाडूंनी भारतीय खुली बॅडमिंटन स्पर्धेतील एकेरीत उपांत्य फेरी गाठली. मात्र भारताच्या एच. एस. प्रणॉय व आर. एम. व्ही. गुरुसाईदत्त यांना एकेरीत पराभवास सामोरे जावे लागले.
अग्रमानांकित सायनाने इंडोनेशियाची खेळाडू हॅना रामाधिनीचा २१-१५, २१-१२ असा सरळ दोन गेम्समध्ये पराभव केला. महिलांच्या अन्य लढतीत थायलंडच्या राचनोक इन्तानोनने सहज विजय मिळविला. तिने चीनची खेळाडू झुई याओ हिच्यावर २१-१४, २१-८ अशी मात केली. विजेतेपदासाठी सायनाची मुख्य प्रतिस्पर्धी असलेली कॅरोलीन मरीन या स्पॅनिश खेळाडूने उपान्त्य फेरीत स्थान मिळविले. तिने उत्कंठापूर्ण लढतीत जपानच्या नोओमी ओकुहारा हिला २१-१५, १७-२१, २१-१५ असे पराभूत केले.
श्रीकांतने उत्कंठापूर्ण लढतीत जपानच्या ताकुमा युएडा याच्यावर मात केली. अटीतटीने झालेला हा
सामना श्रीकांत याने ७८ मिनिटांत
२१-१५, २३-२५, २१-१८ असा जिंकला.
गुरुसाईदत्त याला चीनच्या झुई सोंग याने १५-२१, २१-१८, २१-१३ असे हरविले. माजी जगज्जेता खेळाडू लिन दान याला पराभवाचा धक्का बसला. इंडोनेशियाच्या टॉमी सुगिआतरेने त्याचा २१-१७, १५-२१, २१-१७ असा संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभव केला.
सायनाने हॅनाविरुद्ध सुरेख खेळ करीत प्रथमपासूनच वर्चस्व गाजविले. ४० मिनिटे चाललेल्या या सामन्यात तिने ड्रॉपशॉट्स व कॉर्नरजवळ अचूक फटके असा बहारदार खेळ केला. तसेच तिने सव्र्हिसवरही चांगले नियंत्रण राखले होते. पहिल्या गेममध्ये हॅना हिने तिला झुंज देण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या गेममध्ये तिचा बचाव निष्फळ ठरला.
प्रणॉयने जॉनवरील विजयामुळे उपांत्यपूर्व फेरीबाबत मोठय़ा अपेक्षा निर्माण केल्या होत्या. त्याने व्हिक्टरविरुद्ध पहिली गेम घेत चांगली सुरुवात केली होती. मात्र दुसऱ्या गेममध्ये व्हिक्टरने त्याला फारशी संधी दिली नाही. त्याने ही गेम घेत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. तिसऱ्या गेममध्ये प्रणॉयने चांगला खेळ केला. तथापि व्हिक्टरने आघाडी टिकवीत ही गेम घेतली व सामनाही जिंकला.
गुरुसाईदत्तने सोंगविरुद्ध पहिली गेम घेत झकास सुरुवात केली होती, मात्र नंतर परतीचे फटके व सव्र्हिस यावर नियंत्रण ठेवता आले नाही. दुसऱ्या गेममध्ये त्याला आघाडी टिकविता आली नाही. तिसऱ्या गेममध्ये त्याने सपशेल निराशा केली.
संग्रहित लेख, दिनांक 28th Mar 2015 रोजी प्रकाशित
सायना, श्रीकांत उपांत्य फेरीत
विजेतेपदाची दावेदार असलेल्या सायना नेहवाल व किदम्बी श्रीकांत या भारतीय खेळाडूंनी भारतीय खुली बॅडमिंटन स्पर्धेतील एकेरीत उपांत्य फेरी गाठली.
First published on: 28-03-2015 at 02:15 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal storms into maiden india open semifinal