सायना नेहवाल व पी.व्ही. सिंधू यांना आशियाई बॅडिमटन अजिंक्यपद स्पर्धेतील एकेरी गटात शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीतच पराभवाचा धक्का बसला. त्यांच्या पराभवाबरोबरच भारताचे या स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सायनाला पाचवी मानांकित झु यिंग तेई (चायनीज तैपेई) हिच्याविरुद्ध २१-१६, १३-२१, १८-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. आठव्या मानांकित सिंधूला चीनच्या लि झुरुईने ११-२१, २१-१९, २१-८ असे हरवले.
तेई हिच्याविरुद्ध सायनाने आतापर्यंत पाच वेळा विजय मिळविला असला तरीही तिला प्रत्येक वेळी झगडावे लागले होते. वुहान येथे सायनाने संघर्ष करूनही तिला विजय मिळविता आला नाही. पहिल्या गेममध्ये ६-१० अशा पिछाडीवरून सायनाने ११-११ अशी बरोबरी केली. पुन्हा ती पिछाडीवर पडली. सायना हिने त्यानंतर स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा उपयोग करीत सलग पाच गुण मिळविले आणि हा गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये तेई हिने सुरुवातीपासून खेळावर नियंत्रण मिळविले. तिने १४-७ अशी आघाडी मिळविली. सायना हिने तिला बरोबरीत ठेवण्यासाठी खूप संघर्ष केला, मात्र तेईने आघाडी कायम ठेवत हा गेम घेतला व १-१ अशी बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये तेईने सुरुवातीला ५-१ अशी आघाडी घेतली. सायनाने हळूहळू तिला गाठण्याचा प्रयत्न केला. १७-१७ अशी स्थिती असताना सामन्यातील रंगत वाढली. मात्र तेईने ड्रॉपशॉट्सचा बहारदार खेळ केला व सायनाचे आव्हान संपवले.
सिंधूने झुरुईविरुद्ध पहिल्या गेममध्ये ८-१ अशी आघाडी मिळविली. ही आघाडी मोडून काढणे झुरुईला शक्य झाले नाही. सिंधूने हा गेम घेत मोठय़ा अपेक्षा निर्माण केल्या. दुसऱ्या गेममध्येही सिंधूने ७-३ अशी झकास सुरुवात केली होती. मात्र झुरुईने चिवट झुंज देत ९-९ अशी बरोबरी साधली. तेथून झुरुईने मागे पाहिलेच नाही. तिने १७-१३ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. सिंधूने ही आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र २०-१९ अशी गुणस्थिती असताना झुरुईने स्मॅशिंगचा जोरकस फटका मारून हा गेमजिंकला. त्यामुळे सामन्यात १-१ अशी बरोबरी झाली. निर्णायक गेममध्ये सिंधूला फारशी संधी मिळाली नाही. झुरुईने वेगवान खेळ करीत तिला निष्प्रभ करीत हा गेम घेत उपांत्य फेरीत स्थान मिळविले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina sindhu crash out of badminton asia championship
First published on: 25-04-2015 at 03:41 IST