कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार यांच्याविरोधात कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट आंदोलन करत आहेत. शनिवारी मध्यरात्री कुस्तीपटूंनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत चर्चा केली होती. यानंतर सोमवारी ( ५ जून ) साक्षी मलिकने आंदोलनातून माघार घेतली असल्याचं वृत्त पसरलं होतं. यावर आता साक्षी मलिकने खुलासा केला आहे.

दिल्ली भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा वैशाली पोतदार यांनी साक्षी मलिकने आंदोलनातून माघार घेतलं असल्याचं ट्वीट केलं होतं. त्या म्हणाल्या की, “कुस्तीपटूंच्या आंदोलनातून साक्षी मलिकने माघार घेतली आहे. ती पुन्हा रेल्वेच्या कामावर रुजू होणार आहे.”

आंदोलनातून माघार घेणार असल्याच्या वृत्तावर साक्षी मलिकने ट्वीट करत खुलासा केला आहे. तिने म्हटलं की, “हे वृत्त पूर्णपणे चुकीचं आहे. न्यायासाठीच्या लढाईत आमच्यातील कोणी मागे हटले नाही आणि हटणारही नाही. आंदोलनाबरोबर मी रेल्वेतील जबाबदारी पार पाडत आहे. न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहिल. कृपया चुकीचे वृत्त पसरवू नका.”

“आम्ही गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत चर्चा केली. तेव्हा त्यांना ब्रिजभूषण सिंग यांच्या अटकेची मागणी केली. आम्ही आंदोलनातून माघार घेतली नाही. मी रेल्वेच्या कामावर रुजू होणार आहे. न्याय मिळेपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे. तसेच, मुलीने एफआयआर मागे घेतल्याचं वृत्तही चुकीचं आहे,” असं साक्षी मलिकने ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बजरंग पुनियानेही ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे. “आंदोलनातून माघार घेत असल्याचे वृत्त अफवा आहे. आम्हाला नुकसान पोहचवण्यासाठी वृत्त पसरवलं जात आहे. आम्ही ना माघार घेतली आहे, ना आंदोलन मागे घेतलं आहे. महिला कुस्तीपटूने एफआयआर मागे घेतल्याचं वृत्तही खोटे आहे. न्याय मिळेपर्यंत आमची लढाई सुरुच राहणार,” असं बजरंग पुनियाने म्हटलं आहे.