दुसऱ्या पर्वाच्या नियमांत बदल

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या दुसऱ्या पर्वाच्या नियमांत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक सामन्यासाठी समान गुण मिळणार आहेत. सामना जिंकल्यास १२ गुण, अनिर्णीत राहिल्यास ४ गुण, तर बरोबरीत (टाय) सुटल्यास ६ गुण संघांना मिळतील.

भारत आणि इंग्लंड यांच्यात ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपासून नवी नियमावली लागू होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ ऑलरडाइस यांनी जून महिन्याच्या पूर्वार्धात नियमावलीत बदलाचे संकेत दिले होते.

‘‘जागतिक कसोटी स्पर्धेच्या पहिल्या पर्वात प्रत्येक मालिकेसाठी समान म्हणजे १२० गुणांचा नियम कार्यरत होता. परंतु आता मालिका दोन कसोटींची असो किंवा पाच कसोटींची प्रत्येक सामन्यासाठी कमाल १२ गुण संघाला मिळवता येतील. मग उपलब्ध सामने व गुण याच्या टक्केवारीनुसार क्रमवारी निश्चित केली जाईल,’’ असे ‘आयसीसी’च्या कार्यकारी मंडळातील सदस्याने सांगितले.

भारत-इंग्लंड मालिकेनंतर वर्षाअखेरीस अ‍ॅशेस मालिका पाच कसोटी सामन्यांची होईल, तर ऑस्ट्रेलियाचा संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पुढील वर्षी भारतात येणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदाचे दुसरे पर्व जून २०२३पर्यंत चालेल. कसोटी क्रिकेटचा दर्जा असलेले नऊ संघ एकूण सहा मालिका खेळतील. यात मागील हंगामाप्रमाणेच तीन मायदेशातील आणि तीन परदेशातील मालिकांचा समावेश असेल.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या पर्वात इंग्लंडचा संघ सर्वाधिक सामने खेळला.