भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने रोमानियाच्या होरिआ टेकाऊसह उपांत्यपूर्व फेरीत आक्रमक खेळी करत असिम-उल-हक कुरेशी आणि ज्युलिआ जिओर्जस जोडीवर मात करत स्पर्धेच्या मिश्र दुहेरी गटात उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.
कुरेशी-ज्युलिआ जोडीवर सानिया-टेकाऊ जोडीने ६-३, ६-४ असा सहज विजय मिळविला. सामन्यात सानिया-टेकाऊ जोडीचेच पारडे जड ठरत होते. त्यामुळे अवघ्या ६३ मिनिटांत सामना संपुष्टात आला. या वियजासह सानिया-टेकाऊ जोडी ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीत उपांत्यफेरीत दाखल झाली आहे. या इंडो-रोमानिया जोडीचा उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियन जोडी जार्मिला जाडोसोवा आणि मॅथ्यू एब्डन यांच्याशी सामना होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत सहज विजयामुळे सानिया-टेकाऊ जोडी दमदार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे उपांत्यफेरीतही ही जोडी चांगली कामगिरी करेल अशी भारतीय टेनिस चाहत्यांना आशा आहे.