भारताची आघाडीची टेनिसपटू आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकची पत्नी सानिया मिर्झाचा लहान मुलगा सोबत असतानाही क्लबमध्ये धूम्रपान करतानाची चित्रफीत पाहिल्यावर वीणा मलिकने तिच्या मातृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. मात्र सानियाने मंगळवारी वीणाला ‘ट्विटर’च्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले.
सोमवारी सायंकाळपासून समाजमाध्यमांवर मलिक, सायना त्यांच्या मुलासह इमाम उल हक आणि इमाद वासिम या पाकिस्तानी क्रिकेटपटूंसह शीशा क्लबमध्ये मेजवानी करत असल्याची चित्रफीत चर्चेत होती. ‘‘सानिया, मला तुझ्या मुलाची फार चिंता वाटते. एक आई आणि खेळाडू असूनही तू मुलाला धूम्रपान करणाऱ्या क्लबमध्ये कशी घेऊन जाऊ शकतेस?’’ असे ‘ट्वीट’ वीणाने केले.
प्रत्युत्तरादाखल सानिया म्हणाली, ‘‘वीणा, मी माझ्या मुलाला क्लबमध्ये घेऊन गेलेले नव्हते. किंबहुना मी त्याला घेऊन जावो अथवा न जावो, यामध्ये तुला किंवा इतर कोणालाही पडण्याची आवश्यकता नाही. मला माझ्या मुलाची काळजी योग्य रीतीने घेता येते. दुसरे म्हणजे मी पाकिस्तान क्रिकेट संघाची आहारतज्ज्ञ अथवा आई नसून माझ्यासह असलेल्या खेळाडूंना त्यांच्यासाठी काय योग्य व अयोग्य याची पूर्ण जाणीव आहे.’’