Rajasthan Royals Captain After Sanju Samson: आयपीएल २०२६ स्पर्धा सुरू व्हायला आणखी बराच वेळ आहे. पण त्याआधी होणाऱ्या लिलावाआधी सर्व संघांना आपल्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे. त्याआधी संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स संघाची साथ सोडून चेन्नई सुपर किंग्ज संघात जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. संजू चेन्नईत गेल्यानंतर राजस्थानने रवींद्र जडेजाची मागणी केली आहे. दोन्ही संघांमध्ये होणारा हा करार अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान जर संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स संघातून बाहेर पडला, तर त्याच्या जागी नेतृत्वाची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाणार? जाणून घ्या राजस्थान रॉयल्ससमोर कोणते पर्याय आहेत.
यशस्वी जैस्वाल
राजस्थान रॉयल्सच्या नेतृत्वाची जबाबदारी यशस्वी जैस्वालकडे सोपवली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण यशस्वी या संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. या संघाकडून खेळताना दमदार कामगिरी केल्यानंतर त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. फ्रँचायजीने त्याच्यावर विश्वास दाखवून सुरूवातीपासून रिटेन केलं आहे. जर राजस्थानला दिर्घ काळासाठी कर्णधार हवा असेल, तर ते यशस्वी जैस्वालबाबत नक्कीच विचार करू शकतात.
रियान पराग
गेल्या हंगामात संजू सॅमसन दुखापतीमुळे काही सामने खेळू शकला नव्हता. ज्यावेळी खेळण्याची संधी मिळाली, त्यावेळी तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळत होता. दरम्यान संजूच्या अनुपस्थितीत राजस्थानच्या नेतृत्वाची जबाबदारी रियान परागकडे सोपवली गेली होती. पण तो या संधीचं सोनं करू शकला नव्हता. राजस्थान रॉयल्सला गेल्या हंगामात १४ पैकी अवघे ४ सामने जिंकता आले होते. तर १० सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. पण दिर्घकाळ कर्णधार म्हणून रियान परागदेखील उत्तम पर्याय आहे. कारण रियानकडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये नेतृत्वाचा चांगलाच अनुभव आहे.
ध्रुव जुरेल
राजस्थान रॉयल्स संघासमोर कर्णधारपदासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलचा. ध्रुव जुरेल देखील या संघातील अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. यासह त्याच्याकडेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये संघाचं नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. ध्रुव जुरेलकडे भारतीय अ संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली गेली होती.
नितीश राणा
या संघात नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी आणखी एक प्रबळ दावेदार आहे, तो म्हणजे नितीश राणा. सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक असलेल्या नितीश राणाने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएल स्पर्धेत फलंदाजीत दमदार कामगिरी केली आहे. पण कर्णधार म्हणून त्याला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. याआधी श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असताना, २०२२ आणि २०२३ मध्ये नितीश राणाला कोलकाता नाईट रायडर्स संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. यादरम्यान १४ पैकी ६ सामने जिंकले, तर ८ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.
