पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पहिल्या सामन्याच्या चौथ्या दिवसापर्यंत न्यूझीलंडने आपली स्थिती मजबूत केली आहे. मात्र, सामना अनिर्णितेच्या दिशेने जात असल्याचे दिसून येत आहे. जवळपास चार वर्षांनंतर पाकिस्तानसाठी कसोटी सामना खेळत असलेल्या सरफराज अहमदच्या बॅटमधून धावा झाल्या. पण यष्टीच्या मागे त्याच्या खराब क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
सरफराज अहमदच्या खराब क्षेत्ररक्षणाचा फटका पाकिस्तानला चांगलाच बसला. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात सर्फराजने नौमान अलीच्या षटकांमध्ये अनेक चुका केल्या. तिसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान त्याने केन विल्यमसनचे सोपे स्टंपिंग मिस केले. तसेच दुसऱ्या दिवशी खराब यष्टिरक्षणामुळे पाकिस्तानला पाच अतिरिक्त धावा द्याव्या लागल्या.
सरफराजच्या चुकीमुळे न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसनला २१ धावांवर जीवदान मिळाले. त्यानंतर त्याने द्विशतक झळकावले. याआधीही विल्यमसनने पाकिस्तानविरुद्ध द्विशतक झळकावले होते. पहिल्या सामन्याच्या चौथ्या दिवशी चेंडू सरफराजच्या मागे ठेवलेल्या हेल्मेटवर आदळल्याने किवी संघाला ५ अतिरिक्त धावा मिळाल्या. नियमानुसार, जर चेंडू विकेटच्या मागे ठेवलेल्या हेल्मेटला लागला तर फलंदाजी करणाऱ्या संघाला पेनल्टीच्या ५ धावा मिळतात.
ही घटना न्यूझीलंडच्या डावाच्या १६० व्या षटकातील आहे, जेव्हा विल्यमसनने बॅटने न खेळण्याचा निर्णय घेत फिरकीपटू नौमान अलीच्या षटकातील एक चेंडू पॅडने रोखण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू मागे गेला आणि यष्टिरक्षक सर्फराज अहमदलाही तो समजला नाही. त्यामुळे चेंडू विकेटच्या मागे हेल्मेटला लागला आणि सीमारेषे बाहेर पोहोचला.