‘‘लग्न निश्चित झाले असले तरी खेळ आपण सोडणार नसून फेडरेशन चषक राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल कामगिरी हे आपले पुढील ध्येय असून लग्नानंतरही आपल्या कामगिरीत कोणताच फरक पडणार नाही,’’ असा विश्वास आंतरराष्ट्रीय धावपटू ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊतने व्यक्त केला. वीजनिर्मिती कंपनीत मेकॅनिकल इंजिनीअर असलेल्या महेश तुंगार यांच्याशी २९ एप्रिल रोजी कविताचा विवाह निश्चित झाला असून, हरसूल येथे नुकताच त्यांच्या साखरपुडय़ाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना कविता म्हणाली, ‘‘खेळामुळे आपणास मान, पैसा व प्रसिद्धी मिळाली असल्याने खेळ कधीच सोडणार नाही. आगामी आशियाई आणि ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याची आपली मनीषा असून तुंगार यांच्यासह सासरकडील मंडळींना याबाबत आधीच कल्पना दिली आहे. लग्नानंतर खेळावर परिणाम होतो, हा समज चुकीचा असून सुधा सिंगने तर लग्नानंतर आशियाई स्पर्धेत सुवर्ण मिळविले तसेच ती ऑलिम्पिक स्पर्धेतही सहभागी झाली होती. सुधासिंगसारखी इतर अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे आपण नियमितपणे सराव करणार आहोत.’’ कविताच्या साखरपुडय़ाला क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम, प्रशिक्षक विजेंद्र सिंग, आंतरराष्ट्रीय धावपटू सुधा सिंग, प्रीती राव, मोनिका आथरे आदी मान्यवर उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sawarpada express kavita raut engaged
First published on: 21-02-2013 at 06:33 IST