जेतेपदासाठी कडवी झुंज देणाऱ्या एएस रोमा संघाला कॅटानियाकडून १-४ असा पराभवाचा धक्का सहन करावा लागल्यामुळे ज्युवेंट्सने तीन सामने शिल्लक राखून सेरी ए फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ज्युवेंट्सचे  इटलीतील सर्वोच्च स्पर्धेचे हे सलग तिसरे आणि ३०वे जेतेपद ठरले. सेरी ए स्पर्धेत १०० गुण मिळवणारा ज्युवेंट्स हा पहिला संघ बनण्याच्या मार्गावर आहे. ज्युवेंट्सने आतापर्यंत ३५ सामन्यांत ९३ गुण मिळवले आहेत. ‘‘आम्ही चॅम्पियन ठरलो आहोत,’’ असे ज्युवेंट्सच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हटले आहे. ‘‘सलग पाच वेळा जेतेपद पटकावल्यानंतर आता तीन वेळा जेतेपद मिळवून आम्ही जेतेपदांची संख्या वाढवली आहे,’’ असे ज्युवेंट्सचे प्रशिक्षक अँटोनियो कोंटे यांनी सांगितले.