Shahid Afridi On India vs Pakistan Match: भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ १४ सप्टेंबरला आशिया चषकात आमनेसामने येणार आहेत. मात्र, या सामन्याला अनेक दिग्गज खेळाडूंनी विरोध केला आहे. क्रिकेट चाहतेही हा सामना पाहणार नसल्याचं म्हटलं जात आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी अनेकदा चर्चेत आला आहे. आता भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याआधी देखील त्याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाची स्थिती पाहता भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. इंग्लंडमध्ये पार पडलेल्या लेजेंड्स लीग स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला होता. त्यावेळी शिखर धवन, हरभजन सिंग यांनी पाकिस्तान विरूद्ध खेळण्यास जोरदार विरोध केला होता. पहलगाम हल्ल्यावरून शिखर धवन आणि शाहिद आफ्रिदी यांच्यात सोशल मीडियावर शाब्दिक चकमक देखील पाहायला मिळाली होती.

आता भारत – पाकिस्तान सामन्यापूर्वी शाहिद आफ्रिदीने समा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “ क्रिकेट व्हायलाच हवं हे माझं आधीपासून मत आहे. यामुळे दोन्ही देशातील संबंध टिकून राहतात. इंग्लंडमध्ये लोकांनी तिकीट खरेदी केले कारण त्यांना डब्ल्यूसीएलचा सामना पाहायचा होता. खेळाडूंनी सराव केला आणि त्यानंतर खेळण्यास नकार दिला. असं का केलं? मला तर नाही समजलं.”

वादग्रस्त वक्तव्य करताना शाहिद आफ्रिदी म्हणाला, “काही लोक असे आहेत जे अजूनही स्वतःला आम्ही भारतीय आहोत असं सिद्ध करत आहेत. जेव्हापासून ते जन्माला आले आहेत जे हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत की, आम्ही भारतीय आहोत. मग आशिया चषकात जाऊन समालोचन देखील करत आहेत.” शाहिद आफ्रिदीने केलेलं हे वादग्रस्त वक्तव्य नेमकं कोणासाठी होतं हे कळू शकलेलं नाही.

क्रिकेट चाहत्यांनीही या सामन्याला विरोध केला होता. त्यामुळे भारत – पाकिस्तान सामना होणार की नाही? अशी चर्चा रंगायला सुरूवात झाली होती. अखेर भारत सरकारने या सामन्यासाठी परवानगी दिली. भारत सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की, दोन्ही संघ द्विपक्षीय मालिका सोडून इतर स्पर्धांमध्ये एकमेकांविरूद्ध खेळू शकतात.