पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने त्याच्या स्वप्नातील एकदिवसीय टीमची घोषणा केली. या संघात त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला विशेष स्थान दिले आहे. शतकांच्या बादशहाला आपल्या संघात तो सलामीवीर म्हणून खेळवण्यास इच्छुक दिसते. सचिन तेंडुलकरने क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात ही मधल्या फळीतील फलंदाज म्हणून केली होती. त्यानंतर त्याने भारताकडून सलामीवीर म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली. सचिन ज्यावेळी निवृत्त झाला त्यावेळी तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येत होता. सचिनसोबतच आफ्रिदिने श्रीलंकेच्या कुमार संगकाराला यष्टीरक्षक म्हणून पसंती दिली असून गोलंदाजीमध्ये त्याने सहकारी वासीम आक्रम आणि ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वार्नचा समावेश संघात केल्याचे दिसते.

शाहिद आफ्रिदीची ऑल टाइम वनडे टीम-
सचिन तेंडुलकर (भारत), अॅडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया), रिकि पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया) ब्रायन लारा (वेस्ट इंडिज), इंजमाम उल हक (पाकिस्तान), कुमार संगकारा (श्रीलंका), जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका), वासिम आक्रम (पाकिस्तान), शेन वार्न (ऑस्ट्रेलिया), ग्लेन मॅग्रा (ऑस्ट्रेलिया), कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज)
आफ्रिदीने ३९८ सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१५ मधील विश्वचषक स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना आफ्रिदीने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना म्हणून खेळला होता. अष्टपैलू आफ्रिदीच्या नावावर ८०८४ धावा आहेत. यामध्ये ६ शतकांचा आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. फलंदाजीशिवाय आफ्रिदीने गोलंदाजीमध्ये बहारदार कामगिरी केली आहे. त्यामुळेच एकदिवसीय सामन्यात त्याने ३९५ बळी मिळवले आहेत. यामध्ये त्याने ९ वेळा ५ पेक्षा अधिक बळी मिळवण्याचा करिश्मा केला आहे. आफ्रिदीने त्याच्या संघात सलामीवीर म्हणून सचिन तेंडुलकर आणि अॅडम गिलख्रिस्टला पसंती दिली आहे. त्याच्यामते, हे दोन फलंदाज सर्वाधिक आक्रमक असून विरोधी संघातील कोणत्याही गोलंदाजांच्या माऱ्याला ते सहज परतवून लावू शकतात.