India Champions vs Pakistan Champions: देश आधी आणि मग बाकी सगळं नंतर. देशभक्तीच्या बाबतीत भारतीय सगळ्यात पुढे असतात, हे भारतीयांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. इंग्लंडमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील सेमी फायनलचा सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये होणार होता. पण भारतीय संघाने हा सामना खेळण्यास नकार दिला आणि स्टेडियम सोडून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाकिस्तानला अंतिम फेरीत जाण्याची संधी मिळाली.

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स स्पर्धेत जगभरातील ६ संघांनी सहभाग घेतला आहे. ज्यात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा देखील समावेश आहे. हे दोन्ही संघ साखळी फेरीत आमनेसामने येणार होते. पण भारतीय संघाने या सामन्यावर बहिष्कार टाकला. साखळी फेरीतून माघार घेणं ठीक आहे, पण सेमी फायनलच्या सामन्यावर कोण बहिष्कार टाकणार? असं शाहिद आफ्रिदीला वाटलं होतं. पण देशापुढे सेमीफायनलचा सामना ही खूप छोटी गोष्ट आहे, हे भारतीय खेळाडूंनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.

शाहिद आफ्रिदीची रिॲक्शन व्हायरल

हा सामना रद्द झाल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होऊ लागला आहे. भारतीय खेळाडू सामन्यावर बहिष्कार टाकून अभिमानाने मैदानाबाहेर जात होते. या निर्णयाचं कोट्यवधी भारतीयांनी स्वागत केलं. पण शाहिद आफ्रिदीला हे पाहावलं गेलं नाही. तो स्टेडियमच्या गॅलरीत उभं राहून भारतीय संघाला मैदानाच्या बाहेर जाताना पाहताना दिसून आला. शाहिद आफ्रिदीला विश्वास बसत नव्हता की, भारतीय खेळाडू सेमी फायनलचा सामना सोडून मैदानाबाहेर जात आहेत. यासह त्याला फायनलमध्ये जाण्याचा आनंद देखील झाला होता.

भारतीय संघाने सेमी फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर, शाहिद आफ्रिदी म्हणाला होता की, “ आता भारतीय संघ आमच्यासोबत कसं खेळणार..”, पण आता भारतीय संघाला पाकिस्तानचा सामना करण्याची गरजच पडली नाही. सामन्याआधीच भारतीय संघाने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. आता पाकिस्तानचा संघ फायनलमध्ये दाखल झाला आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सेमी फायनलच्या सामन्यातील विजेता संघ फायनलमध्ये पाकिस्तानचा सामना करेल.