दक्षिण आफ्रिकेत झालेल्या २०१० फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जगप्रसिद्ध गायिका शकिराने ‘वाका वाका’ गाण्यावर जगभरातल्या फुटबॉल रसिकांना थिरकवले. मंत्रमुग्ध करणारा शकिराचा आवाज, सूर-तालांची सुरेख सजावट असा मिलाफ असलेल्या या गाण्याने रसिकांच्या मनात अतूट स्थान मिळवले. आता २०१४ फिफा विश्वचषकासाठीचे पडघम वाजू लागले असून शकिरा पुन्हा एकदा नव्याकोऱ्या भन्नाट गाण्यासह अवतरली आहे.
२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धा ब्राझीलमध्ये होणार आहे. जबरदस्त सळसळती ऊर्जा, मस्ती आणि नृत्यावर थिरकणाऱ्या ब्राझीलच्या संस्कृतीला साजेसे असे ‘ला ला ला..’ गाणे शकिराने तयार केले आहे. ‘डेअर’ या गाण्याला शकिराने नव्याने तालबद्ध केले आहे.
‘‘हे एक जबरदस्त ब्राझिलियन गाणे आहे. शब्द माझे आहेत आणि विश्वचषकासाठीच्या या गाण्याचे ध्वनिचित्रमुद्रणही मी केले आहे. आपला मुलगा मिलान यानेही या गाण्याला आपला आवाज दिला आहे,’’ असे शकिराने सांगितले. पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शकिरा स्वत:च्या अल्बमसह परतली आहे. फुटबॉल विश्वचषकाला लोकाश्रय मिळवून देण्यात स्पर्धेच्या अधिकृत गाण्याचा वाटा मोलाचा असतो.
२०१० फुटबॉल विश्वचषक आणि शकिराचे ‘वाका वाका’ यांचा ऋणानुबंध फुटबॉल रसिकांच्या मनात आजही ताजा आहे. ब्राझीलमध्ये होणारा विश्वचषकही दणक्यात व्हावा, यासाठी स्वरचित गाणे सादर करत शकिराने दमदार पुनरागमन केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Mar 2014 रोजी प्रकाशित
शकिराचे ‘ला ला ला..’
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या २०१० फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जगप्रसिद्ध गायिका शकिराने ‘वाका वाका’ गाण्यावर जगभरातल्या फुटबॉल रसिकांना थिरकवले.

First published on: 24-03-2014 at 04:34 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shakira records second official fifa world cup song