२०१९ विश्वचषकानंतर आपण ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार नसल्याचं डॅरेन लेहमन यांनी स्पष्ट केल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी या पदासाठी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज शेन वॉर्न डॅरेन लेहमनची जागा घेण्यास उत्सुक आहे.
“कोणत्याही क्रिकेट संघाला प्रशिक्षण देण्यासाठी मी कायम उत्सुक असतो. पण ऑस्ट्रेलियासाठी प्रशिक्षणाची संधी आल्यास मी ती आनंदाने स्विकारेन.” ‘Wild World of Sports’ यांच्याशी बोलताना शेन वॉर्नने आपलं मत व्यक्त केलं आहे. सध्या अनेक मातब्बर व्यक्ती ऑस्ट्रेलियन संघाला प्रशिक्षण देत आहेत. त्यामुळे संधी मिळाल्यास मला ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक बनणं नक्कीच आवडेल. मात्र ही संधी मला मिळते की नाही हे येणारा काळ ठरवेल, असंही शेन वॉ़र्नने स्पष्ट केलंय.
काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचे सध्याचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी २०१९ विश्वचषकानंतर आपण प्रशिक्षणाचं काम पाहणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. “गेल्या काही वर्षांमध्ये मी ऑस्ट्रेलिया संघासोबत काम करतोय. या वर्षात अनेक देशांमध्ये जाऊन आम्ही खेळलो, त्यात काहीवेळा आम्हाला यश आलं तर काहीवेळा आम्ही अपयशी ठरलो. पण या वर्षांमध्ये मी माझ्या कामाचा पुरेपूर आनंद घेतला.”
२०१३ साली डॅरेन लेहमन यांनी ऑस्ट्रेलिया संघाच्या प्रशिक्षकपदाची सुत्र हाती घेतली. लेहमन यांच्या प्रशिक्षणाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने नुकतच अॅशेल मालिकेचं विजेतेपद पटकावलं आहे. याव्यतिरीक्तही २०१५ चा विश्वचषक, दक्षिण आफ्रिकेची मालिका यात लेहमनने ऑस्ट्रेलियाला यश मिळवून दिलं होतं. त्यामुळे लेहमनची जागा आगामी काळात कोण घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.