मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीसाठीचा अध्यक्षपदाचा अर्ज अवैध ठरल्याने दिवाणी न्यायालयात धाव घेतलेल्या भारतीय जनता पार्टी पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांच्यावर शरसंधान साधले. शरद पवार आणि त्यांच्या एमसीएमधील सहकाऱ्यांनी संगनमताने कटकारस्थान करत सूडबुद्धीने माझा अध्यक्षपदाचा अर्ज अपात्र ठरवला, असा आरोप या वेळी मुंडे यांनी केला. तर दुसरीकडे शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत काही निवडक वाक्यांमध्ये मुंडे यांच्या वक्तव्यावर टिप्पणी केली.
‘‘गेल्या निवडणुकीच्या वेळी विलासराव देशमुख यांनी अध्यक्षपदाच्या अर्जावर पारपत्रावरील मुंबईच्या निवासाचा पत्ता लिहिला होता. त्या वेळी त्यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला आणि ते निवडणूक लढवू शकले, पण मीदेखील अध्यक्षपदाच्या अर्जावर पारपत्रातील मुंबईतील निवासाचा पत्ता लिहिला असून माझा अर्ज अवैध कसा काय ठरू शकतो? त्यामुळेच विलासरावांना वेगळा न्याय आणि मला वेगळा न्याय एमसीए लावत असून ही निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर ठरवून रद्द करावी, असे मला वाटते आणि या आशयाची याचिका मी दिवाणी न्यायालयात केली असून त्यावर शनिवारी सुनावणी होणार आहे,’’ असे मुंडे यांनी सांगितले.
पवार यांच्यावर शरसंधान करताना मुंडे म्हणाले की, शरद पवार आणि त्यांच्या काही विश्वासातील सहकाऱ्यांनी सूडबुद्धीने मला अपात्र ठरवले आहे. एमसीए हे पवार यांचे संस्थान असून त्यांचीच मक्तेदारी इथे पाहायला मिळते. त्यामुळेच पवार आणि त्यांच्या विश्वासातील अधिकाऱ्यांनी माझ्या विरोधात कटकारस्थान केले आहे.
मुंडे यांच्याबाबत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मांडले. ते म्हणाले की, न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि या प्रकरणात मुंडे यांना योग्य न्याय मिळेल, अशी आशा आम्हाला आहे.
पवार यांनी शेलक्या शब्दांमध्ये मुंडे यांच्या वक्तव्याला उत्तर दिले. पवार म्हणाले की, मला खरे तर अध्यक्षपदाची निवडणूक लढवायला आवडली असती, माझी तशी तीव्र इच्छासुद्धा होती, पण तसे घडले नाही आणि मी बिनविरोध निवडून आलो. या वेळी मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेबाबत विचारले असता पवार यांनी ‘मी आजच मुंबईत आलो’ असे म्हणत आपल्या खास शैलीत जे बोलायचे ते बोलून गेले.