Shashi Tharoor on Cheteshwar Pujara Retirement Decision : भारताच्या कसोटी क्रिकेट संघातील अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पुजाराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत क्रिकेटला रामराम केला आहे. ३७ वर्षीय पुजाराला भारतीय कसोटी संघासाठी १०३ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ७,१९५ धावा जमवल्या आहेत, ज्यात १९ शतकं आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला.
चेतेश्वर पुजाराच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर काँग्रेस नेते व लोकसभा खासदार शशी थरूर यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये थरूर यांनी म्हटलं आहे की “चेतेश्वर पुजारासारख्या उत्तम कसोटी खेळाडूला सन्मानाने निरोप मिळायला हवा होता. पुजारा जिथपर्यंत पोहोचला आहे ती कामगिरी करायला खूप त्याग करावा लागतो.”
पुजाराला सन्मानजनक निरोप मिळायला हवा होता : थरूर
शशी थरूर म्हणाले, “पुजाराच्या निवृत्तीनंतर मनात एक हुरहुर कायम राहणार आहे. अलीकडच्या काळात त्याला भारतीय संघात संधी मिळत नव्हती. तो संघातून बाहेर होता. त्यामुळे आज ना उद्या त्याचा हा निर्णय येणार हे जवळपास ठरलेलंच होतं. तसेच त्याच्याकडे स्वःला सिद्ध करण्यासाठी काही उरलं नव्हतं. तरीसुद्धा त्याने अजून थोडा वेळ संघासाठी खेळायला हवं होतं असं वाटतंय. त्याच्या शानदार कसोटी कारकिर्दीसाठी त्याला एक सन्मानजनक निरोप मिळायला हवा होता.”
शशी थरूर नेमकं काय म्हणाले?
“पुजाराला भारतीय संघातून वगळल्यानंतर त्याने मोठ्या हिमतीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यास सुरुवात केली. त्याने काही चांगल्या खेळी साकारल्या. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची निवड समिती त्याचा विचार सोडून पुढे निघून गेली होती. त्यामुळे आता त्याचं संघात परतणं जवळपास अशक्य होतं. त्यामुळे आता त्याने निवृत्तीबाबत घेतलेला निर्णय चुकीचा म्हणता येणार नाही.”
पुजाराने काय म्हटलंय?
पुजाराने भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याचे भरपूर प्रयत्न केले होते. परंतु, त्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही. अखेर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. पुजाराने आपल्या एक्स अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत लिहिले की, “भारतीय संघाची जर्सी परिधान करणं, राष्ट्रगीत म्हणणं आणि दरवेळी मैदानात उतरून संपूर्ण ताकदीने खेळणं, ही भावना शब्दात व्यक्त करणं अशक्य आहे. ते म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीचा शेवट असतो. तसंच मी आता भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.”