रोहित शर्माच्या जोडीने भारतीय डावाची विस्फोटक सुरूवात करणारा त्याचा जोडीदार म्हणजे शिखर धवन. शिखर धवन आणि रोहित शर्माने सलामीची जोडी म्हणून अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. दरम्यान भारताच्या सलामी जोडींपैकी एक यशस्वी जोडी म्हणून त्याचं नाव आहे. पण शिखर धवनची कारकीर्द अचानक संपुष्टात आली. एकेकाळी भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग असलेला धवन अचानक संघाबाहेर झाला. याच कारण त्याने आपल्या पुस्तकात सांगितलं आहे.
शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं. पण त्यानंतर आता तो त्याने लिहिलेल्या पुस्तकात त्याच्या कारकिर्दीतील अनेक मोठे खुलासे केले आहेत. शिखर धवनने त्याचं आत्मचरित्र ‘द वन’ च्या प्रकाशनाच्या वेळेस अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. इशान किशनचं नाव घेत त्याने मोठा खुलासा केला आहे. दरम्यान एका प्रसंगानंतर त्याचं करियर संपल्याची त्याला जाणीव झाली असंही तो म्हणाला.
जसाजसा काळ पुढे सरकत होता, भारतीय संघाने भविष्याचा विचार करण्यास सुरूवात केली होती. आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना संधी दिली जात होती. याचदरम्यान भारतीय संघात झारखंडच्या युवा खेळाडूला संधी देण्यात आली. हा युवा खेळाडू म्हणजे इशान किशन आणि इशानने बांगलादेशविरूद्ध द्विशतक करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वनडेमध्ये द्विशतक करणारा तो युवा खेळाडू ठरला होता.

इशानचं द्विशतक पाहिलं आणि त्याच क्षणाला धवनला कळलं की त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द आता संपली आहे. धवन याबाबत सांगताना म्हणाला, “मी तेव्हा बरीच अर्धशतक करत खेळत होतो, पण शतक केलं नव्हतं. पण मी सातत्याने ७०,८० धावा सामन्यांमध्ये करत होतो. जेव्हा इशान किशनने द्विशतक केलं, तेव्हा मला जाणीव झाली की माझं करियर संपलं आहे. त्यावेळेला माझे मित्र मला इमोशनल सपोर्ट देण्यासासाठी आले होते. त्यांना वाटलं होतं की मला खूप वाईट वाटत असेल. पण मी शांत होतो, आनंदी होतो.”
यादरम्यान कोच राहुल द्रविड वगळता कोणीही त्याच्याशी संपर्क साधला नव्हता. पण धवनने या गोष्टीवर मनावर घेतल्या नसल्याचं त्याने सांगितलं. धवन म्हणाला, “मी कदाचित राहुल द्रविड यांच्याशी बोललो होतो. त्यांनी माला मेसेज केला होता. प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असतो, प्रत्येकाचं आपआपलं आयुष्य आहे किंवा काही जण सातत्याने दौऱ्यावर असतात, ही खूप साधी गोष्ट आहे. मला काही पहिल्यांदा संघातून ड्रॉप केलं नव्हतं, या गोष्टींची अंडर-१४ पासून आम्हाला सवय असते.”
शिखर धवनने तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी शानदार कामगिरी केली आहे. त्याने १६७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४४.११ च्या सरासरीने ६७९३ धावा केल्या आहेत. यामध्ये १७ शतकं आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय, त्याने ३४ कसोटी सामन्यांमध्ये ४०.६१ च्या सरासरीने २३१५ धावा केल्या आहेत आणि त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या १९० धावा आहे. टी-२० मध्येही धवनने चांगली कामगिरी केली आहे. त्याने ६८ सामन्यांमध्ये २७.९२ च्या सरासरीने १७५९ धावा केल्या आहेत, यामध्ये ११ अर्धशतकांचा समावेश आहे.