Shikhar Dhawan: भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांचा घटस्फोट झाला आहे. त्यांच्या घटस्फोटानंतर मुलगा झोरावरचा ताबा आयशा मुखर्जीकडे आहे. अशात गेल्या काही वर्षांपासून धवन झोरावरला भेटण्यासाठी आणि त्याच्याशी बोलण्यासाठी आतुर आहे. परंतु, त्याचा फोन नंबर ब्लॉक केल्यामुळे त्याला मुलाशी संपर्कही साधता येत नाही. शिखर धवन, त्याचा नंबर ब्लॉक आहे हे माहित असूनही, दर ३-४ दिवसांनी नियमितपणे त्याचा मुलगा झोरावरला मेसेज करत असतो.

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, शिखर धवनने आयेशा मुखर्जीपासून घटस्फोट आणि मुलगा झोरावरपासून वेगळे झाल्यानंतर त्याला झालेल्या भावनिक त्रासाबद्दल खुलासा केला. या मुलाखतीत शिखर धवनने खुलासा केला की, तो त्याला शेवटचे दोन वर्षांपूर्वी भेटला होता. तसेच गेल्या वर्षभरापासून धवन आणि मुलाचे बोलणेही झाले नाही.

मला ब्लॉक केले असले तरी…

शिखर धवन म्हणाला, ‘मला तो आनंदी आणि निरोगी हवा आहे. जरी मला ब्लॉक केले असले तरी मी त्याला दर ३-४ दिवसांनी मेसेज करतो. तो ते मेसेज वाचेल अशी मला अपेक्षा नाही. तो ते वाचत नसेल तर मला काही हरकत नाही, संपर्कात राहणे हे माझे काम आहे. मी हे करत राहीन.”

धवन अध्यात्माकडे

आपल्या ११ वर्षांच्या मुलाशी भावनिकपणे संपर्कात राहण्यासाठी धवन अध्यात्माकडे वळला आहे. शिखर धवन म्हणाला, “माझ्या मुलाला पाहून दोन वर्षे झाली आहेत, त्याच्याशी शेवटचे एका वर्षापूर्वी बोललो होतो. हे कठीण आहे, पण तुम्ही परिस्थीतीबरोबर याच्याशी जगायला शिकता. मला त्याची आठवण येते. मी त्याच्याशी आध्यात्मिकरित्या बोलतो. मला असं वाटतंय की मी रोज त्याच्याशी बोलत आहे, त्याला मिठी मारत आहे. मी माझी ऊर्जेचा आध्यात्मिकरित्या वापर करत आहे. माझ्या मुलाला परत मिळवण्याचा हा एकमेव मार्ग आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयुष्यातील फक्त अडीच वर्षे…

शिखर धवन पुढे म्हणाला की, ‘मला असं कायम वाटतं की मी त्याच्यासोबत आहे, त्याच्याशी बोलत आहे, त्याच्यासोबत खेळत आहे. जेव्हा मी ध्यान करायला बसतो तेव्हा मी कल्पना करतो की, माझा मुलगा आता ११ वर्षांचा आहे, पण मी त्याच्या आयुष्यातील फक्त अडीच वर्षे पाहिली आहेत.”