Shoaib Akhtar Reaction on Indian Players Handshake Snub: भारतीय संघाने पाकिस्तानचा ७ विकेट्सने पराभव करत धूळ चारली. दोन्ही संघांमधील सामन्यापेक्षा यादरम्यान घडलेल्या घटनांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. भारतीय संघाने सामन्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला आणि सर्वजण ड्रेसिंग रूममध्ये परतले. यावर आता शोएब अख्तरने हवालदिल होत वक्तव्य केलं आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने प्रथम गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली आणि पाकिस्तानला २० षटकांत ९ बाद १२७ धावांवर रोखले. त्यानंतर भारताने १५.५ षटकांत केवळ ३ गडी गमावून लक्ष्य गाठले. या सामन्यात, भारताच्या विजयापेक्षा, सूर्यकुमार यादव आणि त्याच्या संघाने हस्तांदोलन न केल्याची घटना सर्वाधिक चर्चेत आली.
नाणेफेकीदरम्यान सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधाराशी हस्तांदोलन केलं नाही. सामना संपल्यानंतर, जेव्हा पाकिस्तान संघ हस्तांदोलनाची वाट पाहत होता, तेव्हा भारतीय खेळाडू थेट मैदानाबाहेर गेले. यानंतर, टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी आणि सपोर्ट स्टाफनेही पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. टीम इंडियाने ड्रेसिंग रूमचा दरवाजा बंद केल्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. या प्रकरणावर आता शोएब अख्तर काय म्हणाला, जाणून घेऊया.
शोएब अख्तरचं IND vs PAK सामन्यातील हस्तांदोलन वादावर वक्तव्य
पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला, “मला समजत नाहीये नेमकं काय बोलू. पण भारतीय संघाला सलाम, संघ चांगला खेळला. पण क्रिकेटला राजकारणाचं वळण दिलेलं नाही. हा क्रिकेट सामना आहे. आम्ही तुमच्याबद्दलही चांगलं बोलतोय. एकमेकांशी हस्तांदोलन करा, काही हरकत नाही. थोडा मोठेपणा दाखवा. भांडण तंटे होत राहतात. घरांमध्ये पण तर वाद होतात, पण हे सगळं विसरून पुढे जातो. पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही गोष्टी वेगळ्या स्तरावर घेऊन जाता.”
सूर्यकुमार यादव आणि भारतीय संघाने हस्तांदोलन न केल्याने, पाकिस्तानचा कर्णधार सामन्यानंतरच्या सादरीकरणात दिसला नाही. यावर अख्तरने त्याचं समर्थन केलं आणि म्हणाला की, “मला प्रेझेंटेशन सेरेमनी बिलकुल आवडली नाही. सलमान अली आघाने बरोबर केलं. तो मुलाखतीसाठी नाही गेला ते बरं झालं.”
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेल्या राजकीय तणावानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा पहिलाच सामना होता. या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर आणि भारतातील अनेक ठिकाणी टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत होती. परंतु बीसीसीआयने स्पष्ट केलं की बहु-राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तानवर बहिष्कार टाकणं शक्य नाही. त्यामुळे हा सामना खेळवण्यात आला, पण भारतीय खेळाडूंनी मैदानावर आणि मैदानाबाहेर त्यांच्या देशाच्या भावनांना प्राधान्य दिलं. याचबरोबर पाकिस्तानवरील विजय भारतीय संघाने पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्यांना आणि भारतीय लष्कराला समर्पित केला.