Asia Cup 2025 Shoaib Akhtar on Pakistan Captain Coach: भारताने आशिया चषकातील सुपर फोर सामन्यात पाकिस्तानला पुन्हा एकदा आस्मान दाखवलं. भारताच्या गोलंदाजांनी फारशी प्रभावी कामगिरी केली नसली तरी फलंदाजांनी मात्र पाकिस्तान संघाची शाळी घेतली. अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. पाकिस्तान पुन्हा एकदा भारतासमोर लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. यानंतर माजी खेळाडू शोएब अख्तर चांगलाच संतापला आहे.
पाकिस्तानचा संघ भारताविरूद्ध सुपर फोर सामन्यात चांगली फलंदाजी करत होता. पाकिस्तानने चांगली सुरूवात करत १० षटकांत १ बाद ९१ धावा केल्या होत्या. मात्र पुढच्या ५ षटकांत संघ फक्त २८ धावा करू शकला. यादरम्यान शिवम दुबेने दोन षटकांत ११ धावा देत २ बळी घेतले.
माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने या टप्प्याला सामन्याचा निर्णायक क्षण असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी संघ निवड, प्रशिक्षक माईक हेसन तसेच कर्णधार सलमान आघा यांना या चुकासाठी जबाबदार धरलं आहे. अख्तरच्या मते संघात खूप जास्त फिरकीपटूंच्या ऐवजी आणखी एक-दोन वेगवान गोलंदाज संघात असायला हवेत.
शोएब अख्तरने आपल्याच संघाच्या कर्णधाराची लाज काढली
शोएब अख्तरने सुरूवातीला पाकिस्तानच्या कर्णधाराला सुनावलं, “मी कोच माईक हेसनच्या कोचिंगबाबत तर आश्चर्यचकित आहेच, पण कॅप्टनबद्दल बोलायचं झालं तर त्याला काहीच कळत नाही. तो संघाचं कसं नेतृत्त्व करतोय? मैदानात काय खेळतोय? काहीच त्याला माहित नाहीये.” असं अख्तर PTV Sports वर बोलताना म्हणाला.
“तो (कर्णधार सलमान आघा) संघातील सर्वात कच्चा दुवा आहे. तो ज्या क्रमांकावर खेळतो, तिथे खेळण्यासाठी तो पात्र आहे का? कोणीही यावर चर्चा करत नाहीये. पण तो मध्यफळीतील सगळ्यात कमकुवत दुवा आहे. तो करतो तरी काय? मला सांगा बरं. भारतीय संघात सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या किंवा तिलक वर्मा उतरतात, तुलना करून बघा.”, असं म्हणत अख्तरने आपल्याच संघाच्या कर्णधाराची लाज काढली.
अख्तर पुढे म्हणाला, “हो, चांगला मुलगा आहे, ते ठीक आहे. कॅप्टन म्हणून तो ठिके चला. पण टॅलेंट, त्याच्यातील टॅलेंटमुळे तो संघासाठी काय योगदान देतो? अख्तर पुढे म्हणाला, १५८.१९ चा स्ट्राईक रेट असलेला हसन नवाज संघात हवा होता.
अख्तरचं पाकिस्तानच्या संघनिवडीबाबत मोठं वक्तव्य
“सर्वात आधी तर संघनिवडच चुकीची होती. १० षटकांत ९१ धावा झाल्या होत्या, तिथून १५ व्या षटकापर्यंत १४० आणि अखेरीस २०० पर्यंत जाता आलं असतं. आजची खेळपट्टी खूपच अनुकूल होती. त्या वेळी जर एखादा स्थिरावलेला फलंदाज खेळत असता तर वेगळं चित्र असतं. पण हुसैन तलात आला आणि त्याने सामना स्लो डाऊन केला. त्यानंतर मोहम्मद नवाजने १९ चेंडूत २१ धावा केल्या आणि धावबाद झाला,” असं अख्तर पुढे म्हणाला.
“दुसरं म्हणजे, जर तुम्हाला सईम अयूबकडून पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करून घ्यायचीच होती, तर त्याला तीन षटकं का दिली नाहीत? आणि जर तसं करायचं होतं, तर मग अधिक वेगवान गोलंदाज संघात का घेतले नाहीत? नक्की काय विचार केला होता? संघनिवडीमागची प्रक्रिया काय आहे, मला फक्त हेच जाणून घ्यायचं आहे. बाकी काही ऐकायचं नाही. कुणी मला फोन करून सांगेल का की हेच कारण आहे ज्यामुळे आम्ही अमुक अमुक खेळाडूची निवड केली नाही?” असं म्हणत शोएब अख्तरने सर्वांनाच सुनावलं.