Shoaib Akhtar on Mohsin Naqvi & Pakistan Cricket Team : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर हा नेहमी पाकिस्तान, भारत व इतर क्रिकेट संघांच्या कामगिरीविषयी टीव्हीवर चर्चा करताना दिसतो. पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने चांगली कामगिरी केली नसेल तर तो त्यांच्या संघातील खेळाडूंवर जाहीर टीका करताना हयगय करत नाही. यासह तो पाकिस्तान क्रिकेट बोर्ड व संघ व्यवस्थापनावरही तोंडसुख घेताना दिसतो. आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तानच्या संघाची कामगिरी, अंतिम सामन्यात भारताने मिळवलेल्या विजयानंतर आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख मोहसीन नक्वी यांनी घातलेल्या गोंधळावरूनही शोएबने तोंडसुख घेतलं आहे.

एका क्रीडा वाहिनीशी बोलत असताना शोएब अख्तर याला विचारण्यात आलं की आपल्या खेळाडूंमध्ये पूर्वीसारखी चमक राहिलेली नाही असं तुम्हाला वाटतं का? यावर शोएब म्हणाला, “आपल्या संघाचा कर्णधार सलमान अली आगाह हा स्वतः प्रेरणादायक नाही. अशा स्थिती संघात जोश कुठून येणार? कर्णधार स्वतः संघात स्थान मिळवण्यास पात्र नाही. त्यामुळे त्याच्याकडून आपल्या इतर खेळाडूंना प्रेरणा कशी मिळणार?”

शोएब अख्तरची पाकिस्तानी संघाच्या कर्णधारावर टीका

मोहसीन नक्वी यांच्या नेतृत्वाखालील संघव्यवस्थापनावरही शोएबने टीका केली. तो म्हणाला, “हे संघव्यवस्थापन दिशाहिन आहे. पाकिस्तानचं संघव्यवस्थापन शीर नसलेल्या कोंबड्यासारखं आहे. संघाची निवडही योग्य नव्हती. कर्णधाराकडे काहीच खास नाही, त्याच्याकडे नेतृत्वगुण नाहीत. आमच्यासारखे निवृत्त खेळाडू, अनुभवी माजी खेळाडू आणि दिग्गजांनी त्यांना काही सल्ले देण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते लोक आमचं काहीच ऐकत नाहीत. आपला कर्णधार ज्या प्रकारचं क्रिकेट खेळतो ते पाहता तो मधल्या फळीत खेळण्यास पात्र नाही.”

पाकिस्तानी संघाची गोलंदाजी ढेपाळली आहे असं वाटतं का? असा प्रश्न विचारल्यावर अख्तर म्हणाला, “आपण एके काळी जलदगती गोलंदाजीचा आनंद घ्यायचो. जलदगती गोलंदाजी ही आपली ओळख होती. आता जलदगती गोलंदाजांच्या नावाखाली काही भित्रे आणि ठीकठाक दर्जाचे खेळाडू आपल्या संघव्यवस्थापनाला आवडू लागले आहेत. आपल्या क्रिकेट बोर्डाला आता अशी मुलं हवी आहेत जी आठ वाजले की संचारबंदी असल्याप्रमाणे घरी बसतील. बोर्डाला अशी ‘लल्लू-कट्टू’ मुलं हवी आहेत.”

शोएब मोहसीन नक्वींना सल्ला देत म्हणाला, “भारताने रणजी चषक स्पर्धेत भरपूर पैसे गुंतवले आहेत. तिथे खेळाडू दररोज एक लाख रुपये कमावतात. तिथून चांगले हिरे शोधून आणले जात आहेत. हीच मुलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकतायत. आपणही देशांतर्गत क्रिकेटकडे लक्ष द्यायला हवं.”