टी-२० विश्वचषकातील भारताच्या अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी भारत या स्पर्धेत कुठे चुकला यासंदर्भातील मतप्रदर्शन केलं आहे. विशेष म्हणजे या वेळेस अरुण यांनी आयपीएलचा उल्लेख करत विश्वचषक आणि आयपीएलमध्ये अंतर असायला हवं होतं असं मत व्यक्त केलंय. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करल्याने भारताची पुढील सर्व समीकरणे बिघडली, अशी कबुली अरुण यांनी दिली. त्याशिवाय जैव-सुरक्षित वातावरणात म्हणजेच बायो-बबलमध्ये सातत्याने क्रिकेट खेळल्याने खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम झाला, असेही अरुण यांनी सांगितले.

ते दोन पराभव आणि विश्रांती…
रविवार दुपारी न्यूझीलंडने अफगाणिस्तानला नमवल्याने भारताचे टी-२० विश्वचषकातील आव्हान अव्वल-१२ फेरीतच संपुष्टात आले. त्यामुळे आता सोमवारी भारताच्या नामिबियाविरुद्ध होणाऱ्या लढतीला फारसे महत्त्व उरलेले नाही. २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सलामीच्या लढतीत पाकिस्तानने भारताला १० गडी राखून धूळ चारली होती. त्यानंतर न्यूझीलंडने ८ गडी राखून भारताला पराभवाचा सलग दुसरा धक्का दिला होता. या दोन पराभावांनंतर भारत सावरुच शकला नाही. या स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलताना या दोन पराभवांबरोबरच आयपीएल आणि विश्वचषक स्पर्धेमधील अंतर हा सुद्धा महत्वाचा मुद्दा ठरल्याचं अरुण म्हणाले.

दोन आठवड्यांची विश्रांती असती तर…
‘आयपीएल’ आणि विश्वचषकाच्या आयोजनांत काही दिवसांचे अंतर असते, तर खेळाडूंना पुरेसी विश्रांती मिळून नव्या दमाने अभियानाला सुरुवात करता आली असती, असे अरुण यांनी नमूद केले. ‘‘गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही जैव-सुरक्षित वातावरणात राहत असून सातत्याने विविध स्पर्धा आणि द्विपक्षीय मालिका खेळत आहोत. त्यामुळे ‘आयपीएल’ संपल्यानंतर किमान दोन आठवडय़ांची विश्रांती खेळाडूंना मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा तयार होण्यासाठी सोयीची ठरली असती, असे मला वाटते,’’ असे अरुण यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी कोहलीनेसुद्धा जैव-सुरक्षिततेचा मुद्दा मांडतानाच भारतीय खेळाडूंच्या देहबोलीविषयी भाष्य केले होते.

पाकिस्तानच्या सामन्याने समीकरणे बिघडली…
“यंदाच्या विश्वचषकात नाणेफेक जिंकणाऱ्या संघांचेच वर्चस्व पाहायला मिळाले. त्यातच दुबईची खेळपट्टी दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला अधिक लाभदायक ठरत होती. पाकिस्तानविरुद्ध आम्हाला या बाबींचा नक्कीच फटका बसला. त्यांनी दर्जेदार खेळ करताना आम्हाला एकदाही डोके वर काढण्याची संधी दिली नाही आणि त्यांच्याविरुद्ध झालेल्या पराभवामुळेच सर्व समीकरणे बिघडली,’’ असे अरुण  नामिबियाविरुद्धच्या लढतीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. १५ ऑक्टोबर रोजी आयपीएलची फायनल झाली आणि त्यानंतर १८ ऑक्टोबरपासून टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली. भारताचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संघनिवडीबाबत मत व्यक्त करण्यास नकार
विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातून काही अनुभवी खेळाडूंना वगळल्यामुळे तुम्हाला धक्का बसला का, असे विचारले असता अरुण यांनी उत्तर देण्यास नकार दिला. ‘‘कोणत्याही स्पर्धेसाठी संघनिवड करण्याचे कार्य आमचे नसते. निवड समितीने १५ सर्वोत्तम खेळाडूंची निवड केली आणि आम्हाला त्यांच्यासोबतच खेळणे अनिवार्य असते. त्यामुळे यासंबंधी मी अधिक बोलू इच्छित नाही,’’ असे अरुण म्हणाले.