Shreyas Iyer Catch and Injury Video IND vs AUS: श्रेयस अय्यर त्याच्या फलंदाजीबरोबरच मैदानावरील त्याच्या जबरदस्त फिल्डिंगसाठी ओळखला जातो. याचाच प्रत्यय श्रेयसने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये अनपेक्षित झेल टिपत दिला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम गोलंदाजीसाठी पाचारण केलं. भारताच्या गोलंदाजांविरूद्ध सुरूवातीला फटकेबाजी केल्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पुनरागमन केलं.
भारताच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या टॉप-३ फलंदाजांना अर्धशतकापर्यंत पोहोचू दिलं नाही. पण मॅट रेनशॉने मात्र त्याचं पहिलं अर्धशतक झळकावलं. रेनशॉने ४८ चेंडूत वनडेमधील पहिलं अर्धशतक पूर्ण केलं. रेनशॉ आणि कॅरी यांनी चांगली भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण श्रेयसच्या कमालीच्या झेलने ही भागादारी तुटली.
सामन्यातील ३४ वे षटक टाकण्यासाठी हर्षित राणा आला. हर्षितच्या पहिल्याच चेंडूवर रेनशॉने पहिला चौकार लगावला. यानंतर चौथ्या चेंडूवर एलेक्स कॅरी मोठा फटका खेळायला गेला, पण चेंडू वर हवेत उंच उडाला. हा चेंडू टिपण्यासाठी श्रेयस अय्यर मागच्या दिशेला धावत गेला आणि त्याने धावत असतानाच हा कमालीचा झेल टिपला.
श्रेयसने झेल पकडला आणि तो खाली पडणार तितक्यात चेंडू हातातून निसटत होता, जो त्याने घट्ट शरीराशी धरला. पण खाली पडताना श्रेयस डाव्या कुशीवर पडला. श्रेयस इतक्या जोरात पडला की तो वेदनेने कळवळताना दिसला. श्रेयस पडल्यानंतर उठण्याचा प्रयत्न करत होता, पण तो उठू शकला नाही आणि मैदानावर झोपला. फिजिओने मैदानावर येत त्याची तपासणी केली. अखेरीस त्याला प्रचंड त्रास होत असल्याने तो मैदानाबाहेर गेला.
श्रेयस अय्यरच्या या झेलचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला, पण त्याच्या दुखापतीबाबत अद्याप काही अपडेट समोर आलेली नाही. श्रेयस पुन्हा फलंदाजीला येणार की नाही, यावर सर्वांच्या नजरा आहेत.
