Shubman Gill Record in IND vs ENG test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत शुबमन गिलने आपल्या फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शुबमन गिलच्या सातत्यपूर्ण फलंदाजीने विक्रमांची रांग लावली आहे. प्रत्येक शानदार खेळीदरम्यान त्याने नवनवीन विक्रम आपल्या नावे केले आहेत. मँचेस्टर कसोटीतही कमालीची फलंदाजी करत त्याने भारतीय संघाचा डाव सावरला आहे. या खेळीदरम्यान अनोखी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.
शुबमन गिलने इंग्लंडविरूद्ध मालिकेत ७०० धावांचा टप्पा पार केला आहे. शुबमन गिल इंग्लंडमध्ये कसोटीत ७०० अधिक धावा करणारा आशियातील पहिला फलंदाज ठरला. त्याने संयमी फलंदाजी करत प्रसंगी आक्रमक फटके खेळत संघाचा डाव सावरत आपली खेळी साकारली.
शुबमन गिल ७०० अधिक धावा करणारा पहिला भारतीय कर्णधार
भारताचा कर्णधार शुभमन गिल विदेशात कसोटी मालिकेत ७०० पेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय कर्णधार बनला. चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान त्याने हा टप्पा गाठला. २५ वर्षीय गिलने एकाच कसोटी मालिकेत ७०० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत सामील झाला, ज्यामध्ये सर डॉन ब्रॅडमन (दोनदा), सर गारफिल्ड सोबर्स, ग्रेग चॅपेल, सुनील गावस्कर, डेव्हिड गोवर, ग्राहम गूच आणि ग्रॅमी स्मिथ यांचा समावेश आहे.
गावस्कर आणि यशस्वी जैस्वाल यांच्यानंतर एका कसोटी मालिकेत ७०० धावांचा टप्पा ओलांडणारा गिल हा आता तिसरा भारतीय ठरला आहे. ओल्ड ट्रॅफर्ड येथे भारताच्या दुसऱ्या डावात त्याने केलेल्या शानदार खेळीनंतर त्याने हा विक्रम केला. चौथ्या कसोटी सामन्यात फलंदाजीला उतरण्यापूर्वी गिलने ७ डावांमध्ये ६१९ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये एजबॅस्टन येथे कारकिर्दीतील सर्वोत्तम २६९ धावांच्या खेळीचा समावेश आहे.
२०१४ च्या इंग्लंड दौऱ्यातील विराट कोहलीच्या ६९२ धावांच्या विक्रमाला मागे टाकण्यासाठी त्याला ७४ धावांची आवश्यकता होती आणि ७०० धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला ८१ धावांची आवश्यकता होती. मँचेस्टर कसोटीत दुसऱ्या डावाच्या पहिल्याच षटकात दोन विकेट गमावल्यानंतर गिल फलंदाजीला उतरला. त्याने केएल राहुलसह १८० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत पराभव टाळण्यासाठी मोठी भूमिका बजावली.
भारताकडून एका कसोटीत ७०० अधिक धावा करणारे खेळाडू
७७४ – सुनील गावस्कर वि. वेस्ट इंडिज, १९७१ (विदेशात)
७३२ – सुनील गावस्कर वि. वेस्ट इंडिज, १९७८,७९ (घरच्या मैदानावर)
७१२ – यशस्वी जैस्वाल वि. इंग्लंड, २०२४ (घरच्या मैदानावर)
७०१* – शुबमन गिल वि. इंग्लंड, २०२५ (विदेशात)