Shubman Gill Broke Sunil Gavaskar Record: सध्या वादळी फॉर्मात असलेला भारताचा कसोटी कर्णधार शुबमन गिलने पाचव्या कसोटी सामन्यात अवघ्या काही धावा करताच मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात मालिकेतील अखेरचा आणि पाचवा कसोटी केनिंग्टन ओव्हलच्या मैदानावर खेळवला जातोय. सलग पाचही सामन्यांची नाणेफेक जिंकलेल्या इंग्लंडने या सामन्यात प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यासह फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. अवघ्या काही धावा जोडताच दोन्ही सलामीवीर बाद झाले. यानंतर गिल साई सुदर्शनच्या साथीने भारताचा डाव सावरत आहे.
शुबमन गिल संपूर्ण मालिकेत वादळी फॉर्मात असून त्याने अनेक विक्रम मोडत आपल्या नावे केले आहे. सुनील गावस्कर, सर डॉन ब्रॅडमन यांचे कसोटी क्रिकेटमधील मोठमोठे आणि ऐतिहासिक विक्रमांची त्याने बरोबरी साधली आहे. सुनील गावस्करांप्रमाणे एकाच सामन्यात द्विशतक आणि शतक करण्याचा विक्रमही त्याने केला आहे.
शुबमन गिल हा एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. आता या बाबतीत सुनील गावस्करांना त्याने मागे टाकलं आहे. गिलला हा विक्रम मोडण्यासाठी फक्त ११ धावांची गरज होती. पाचव्या सामन्यात त्याने ११ धावा काढताच हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय कर्णधार
शुबमन गिल वि. इंग्लंड – ७३३* धावा (२०२५)
सुनील गावस्कर वि. वेस्ट इंडिज – ७३२ धावा (१९७८)
विराट कोहली वि. इंग्लंड – ६५५ धावा (२०१६)
शुबमन गिलने मोडला गावस्करांचा सर्वात मोठा विक्रम
सुनील गावस्कर यांनी १९७८/७९ मध्ये सर्वाधिक धावा करण्याची कामगिरी केली होती. कर्णधार म्हणून त्यांनी एका कसोटी मालिकेत ७३२ धावा केल्या होत्या. मात्र, आता हा विक्रम गिलने मोडला आहे. आता तो एका कसोटी मालिकेत ७३३ धावा करून कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. एवढंच नाही तर गिलने सेना देशांमध्ये एका मालिकेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार होण्याचा मानही मिळवला.
शुबमन गिलची या विक्रमांवर नजर
शुभमन गिलची नजर आता मोठ्या दोन विक्रमांवर आहे. सुनील गावस्कर यांनी एका मालिकेत ७७४ धावा केल्या होत्या आणि आता शुबमन गिलही काही धावांनी मागे आहे. जर गिलने ८११ धावा केल्या तर तो डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकलं. इंग्लंडमध्ये एका मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. हा विक्रम गेल्या ९० वर्षांपासून कायम आहे आणि आता गिलकडे हा विक्रम मोडण्याची संधी आहे.