Shubman Gill Test Hundred in Manchester IND vs ENG: मँचेस्टर कसोटीत टीम इंडियाचा तारणहार ठरलेल्या शुबमन गिलने महत्त्वपूर्ण खेळी करत आपलं शतक झळकावलं आहे. इंग्लंडच्या तिखट माऱ्यापुढे मैदानात पाय रोवून घट्ट उभं राहत गिलने भारताचा डाव सावरला आणि शतकही झळकावलं. राहुलच्या साथीने १८० अधिक धावांची भागीदारी रचत गिलने भारताला ०-२ पासून ते २०० अधिक धावांचा पल्ला गाठून दिला.

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत, भारतीय क्रिकेट संघाचा युवा कर्णधार शुबमन गिलची बॅट चांगलीच तळपत आहे. मँचेस्टर कसोटीच्या दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावून, गिलने केवळ आपल्या संघाला मजबूत स्थितीत आणले नाही तर एक ऐतिहासिक विक्रमही आपल्या नावावर केला. गिलने सुनील गावस्कर, डॉन ब्रॅडमन आणि विराट कोहलीनंतर एका कसोटीत अनोखी कामगिरी करणारा फलंदाज ठरला आहे.

मँचेस्टर कसोटीत, दुसऱ्या डावात भारतीय संघ मोठ्या अडचणीत होता. इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीला धक्के देऊन भारतावर दबाव आणला. पण कर्णधार शुबमन गिलने संयम राखला आणि दमदार कामगिरी केली. गिलने आपला डाव सावधगिरीने सुरू केला आणि नंतर आक्रमक फटके खेळत खेळी साकारली. कव्हर ड्राइव्ह, लोफ्टेड शॉट्स आणि बॅकफूट पंच यांसारखे फटके खेळत त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांनी उत्तर दिलं. गिलने २२८ चेंडूत शतकी खेळी केली.

शुबमन गिल हा एका कसोटी मालिकेत ४ शतकं झळकावणारा भारताचा तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी सुनील गावस्कर (दोनदा), विराट कोहली यांनीच हा पराक्रम केला होता. याशिवाय एका कसोटी मालिकेत सर्वाधिक शतकं करणारा गिल हा सुनील गावस्कर आणि डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर तिसरा कर्णधार ठरला आहे.

भारताकडून एका कसोटी मालिकेत सर्वाधिक शतकं करणारे फलंदाज

४ शतकं – सुनील गावस्कर वि. वेस्ट इंडिज, १९७१ (विदेशात)
४ शतकं – सुनील गावस्कर वि. वेस्ट इंडिज, १९७८/७९ (घरच्या मैदानावर )
४ शतकं – विराट कोहली वि. ऑस्ट्रेलिया, २०१४/१५ (घरच्या मैदानावर)
४ शतकं – शुबमन गिल वि. इंग्लंड, २०२५ (विदेशात)

एका कसोटी मालिकेत सर्वाधिक शतकं करणारे कर्णधार

४ शतकं – सर डॉन ब्रॅडमन वि. भारत, १९७४/४८ (घरच्या मैदानावर )

४ शतकं – सुनील गावस्कर वि. वेस्ट इंडिज, १९७८/७९(घरच्या मैदानावर )

४ शतकं – शुबमन गिल वि. इंग्लंड, २०२५, (विदेशात)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुबमन गिलने इंग्लंडविरूद्ध मालिकेत ७०० धावांचा टप्पा पार केला आहे. शुबमन गिल इंग्लंडमध्ये कसोटीत ७०० अधिक धावा करणारा आशियातील पहिला फलंदाज ठरला. त्याने संयमी फलंदाजी करत प्रसंगी आक्रमक फटके खेळत संघाचा डाव सावरत आपली खेळी साकारली.