Shubman Gill Replacement: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू असतानाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. सामन्यातील दुसऱ्या दिवशी फलंदाजी करत असताना गिलच्या मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मैदान सोडून बाहेर जावं लागलं होतं. आता तो या सामन्यातून बाहेर पडला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ झाल्यानंतर त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यामुळे भारतीय संघाला १० फलंदाजांसह फलंदाजी करावी लागणार आहे.
शुबमन गिल या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने स्वीप शॉट मारून चौकार मारला आणि आपलं खातं उघडलं. पण शॉट मारल्यानंतर त्याच्या मानेला दुखापत झाली. त्यानंतर फिजिओ मैदानात आले. पण त्याला वेदना असहाय्य होत होत्या, त्यामुळे त्याला मैदान सोडून बाहेर जावं लागलं. तो ४ धावांवर रिटायर्ड हर्ट होऊन बाहेर गेला. त्यानंतर संध्याकाळी त्याला कोलकात्यातील रूग्णालयात भरती करण्यात आलं.
दुसऱ्या डावात भारतीय संघ १० फलंदाजांसह उतरणार मैदानात
या सामन्यातील पहिल्या डावात गिल अवघ्या ४ धावा करून रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला. त्यानंतर तो पुन्हा एकदा फलंदाजीला येऊ शकला नव्हता. त्यामुळे पहिल्या डावात भारतीय संघाला १० फलंदाजांसह खेळावं लागलं होतं. त्यामुळे दुसऱ्या डावातही भारतीय संघाला १० फलंदाजांसह खेळावं लागणार आहे. आयसीसीच्या नियमानुसार, जर एखादा फलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर झाला असेल, तर त्याच्याजागी दुसरा फलंदाज फलंदाजी करू शकत नाही. त्या संघाला १० फलंदाजांसह फलंदाजी करावी लागते. जर एखादा फलंदाज कन्क्शनमुळे बाहेर पडला असेल, तर त्याच्या जागी बदली फलंदाज दिला जातो. गिलच्या जागी ११ वा खेळाडू क्षेत्ररक्षण करू शकतो, पण फलंदाजी करू शकत नाही. त्यामुळे ९ विकेट्स गेल्यानंतर भारतीय संघाचा डाव इथेच संपेल.
भारतीय संघाला विजयासाठी १२४ धावांची गरज
या सामन्यात गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. त्यामुळे फलंदाज संघर्ष करताना दिसून आले आहेत. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या १५९ धावांवर आटोपला होता. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला १८९ धावा करता आल्या. भारताने पहिल्या डावात ३० धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा डाव १५३ धावांवर आटोपला. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १२४ धावांची गरज आहे.
